ऑक्सिजनचा तुटवडा, ६ रुग्णालयांतील १६८ कोविड रुग्णांना इतर रुग्णालयात हलवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 April 2021

ऑक्सिजनचा तुटवडा, ६ रुग्णालयांतील १६८ कोविड रुग्णांना इतर रुग्णालयात हलवले



मुंबई - देशभरात कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ रुग्णांना ऑक्सिजची सोय तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी इतर कोविड रुग्णालय, कोविड केंद्रामध्ये हलवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व २४ प्रशासकीय विभागात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखता यावा म्हणून, अन्न व औषध प्रशासन तसेच ऑक्सिजन उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासोबत समन्वय साधला जातो आहे. त्यासाठी महानगरपालिकेने सहा समन्वय अधिकारी नुकतेच नियुक्त केले आहेत. हे समन्वय अधिकारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा बाबतची अडचण तात्काळ सोडवण्यास मदत होणार आहे. भविष्यातही ऑक्सिजन पुरवठा संबंधी अशी कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची खबरदारी महानगरपालिका प्रशासनाने घेतली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग बाधितांना वैद्यकीय उपचार देताना ऑक्सिजनची गरजही निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन असलेल्या बेड्स उपलब्ध आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऑक्सिजन वितरण करताना शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जिथे प्राणवायूची पुरेशी व्यवस्था आहे अशा सुरक्षित ठिकाणी संसर्ग बाधितांना स्थलांतरित करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

या रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा
ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने महानगरपालिकेच्या वांद्रे भाभा रुग्णालय, कुर्ला भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालय, जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालय या सहा रुग्णालयातील एकूण १६८ रुग्णांना इतर रुग्णालये, समर्पित कोविड आरोग्य केंद्रात सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad