भांडुपमधील स्मशानभूमी व वॉररुमबाबत येथील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. येथील स्मशानभूमीला गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसला थकीत बिलामुळे गॅस पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहे. यामुळे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करताना अडचणी येत होत्या. तसेच कोरोना रुग्णांना बेडसाठी वॉर्ड- वॉर रुमवर फोन केल्यास तो उचलला जात नाही, अशा तकारी नागरिकांनी केल्या होत्या. या तकारींची दखल घेत महापौरांनी नागरिकांशी संवाद साधला. कोरोना काळात गॅसमुळे अंत्यसंस्कार करण्यात अडचण निर्माण होऊ नये, ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी तातडीने भेट दिल्याचे महापौरांनी सांगितले. स्मशानभूमी संचालित करणाऱ्या संबंधित संस्थेला तातडीने देयक अदा करण्याचे निर्देशही महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. यापुढील काळात या प्रकारच्या अशा घटना घडू नये, याची खबरदारी घ्यावी तसेच वाँररूममध्ये आलेल्या प्रत्येक दूरध्वनी हा उचललाच गेला पाहिजे, असे निर्देशही महापौरांनी दिले.
वाँररूमचे तीन शिफ्टमध्ये काम चालत असून आलेल्या दूरध्वनीनुसार संबंधित रुग्णाला उपलब्ध असलेल्या ठिकाणी बेड उपलब्ध करून द्यावेत तसेच रुग्णांनी आपल्या आवडीनुसार रुग्णालयाची मागणी न करता ज्या ठिकाणी बेड उपलब्ध होत असेल त्या ठिकाणी तातडीने उपचार घ्यावा, असे आवाहनही महापौरांनी केले.
No comments:
Post a Comment