ड्रीम्स मॉलमधील आग निष्काळजीमुळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2021

ड्रीम्स मॉलमधील आग निष्काळजीमुळेमुंबई - भांडुप येथील ड्रीम्स मॉल आगप्रकरणी मुंबई अग्निशमन दलाने आपला अहवाल तयार केला असून मॉलमधील एकूणच सावळागोंधळ व निष्काळजी या अहवालात उघड झाली आहे. मॉलमधील अग्निरोधक यंत्रणा बंद होती, आग विझविताना अडथळा ठरणारी अवैध बांधकामे आणि मॉल व्यवस्थापनाचा ढिसाळपणा यावर अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये २६ मार्च रोजी आग लागली होती. या आगीत मॉलमधील सनराइज कोविड रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला तर सुमारे ७६ जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी अग्निशमन दलाने अहवाल तयार केला असून तो पालिका प्रशासनाला पाठवला आहे.

मॉलमधील तळ मजल्यावरील १४० क्रमांकाच्या गाळ्यात आग लागली. त्यानंतर ती इतर गाळ्यांमधून पसरून वरच्या मजल्यापर्यंत पसरली असे यात म्हटले आहे. मॉलमधील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नव्हती. सर्व मजल्यांवर आगीमुळे उष्णता निर्माण झाली तसेच धूर पसरला. त्यानंतरही मॉलमधील सायरन किंवा स्प्रिंकलर्स सुरू झाले नाहीत. त्यामुळे मॉलची अग्निशमन यंत्रणा कार्यरत नव्हती, असे स्पष्ट होत आहे. असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मॉलमधील अनेक भाग काही वर्षांपासून सुरू नव्हते. या भागात अवैध बांधकामे असल्याने आग विझविताना ती अडथळा ठरली होती. रुग्णालयासारख्या संवेदनशील यंत्रणेला परवानगी देताना मॉल व्यवस्थापनाने पुरेशी काळजी घेतलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या अहवालाबाबत अग्निशमन दलाचे उपप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या निष्कर्षांना दुजोरा दिला. अग्निरोधक यंत्रणेतील त्रुटींबाबत अग्निशमन दल कारवाई करते तर, अवैध बांधकामांबाबत प्रभाग कार्यालयाला कारवाईची शिफारस केली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.

या आगीची चौकशी करण्यासाठी पालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदळे यांची चौकशी समिती नेमली असून तिचा अहवाल प्रलंबित आहे. या अहवालात मॉलमध्ये रुग्णालय उभारण्यास का परवानगी देण्यात आली, विक्रोळी एस विभागातील आरोग्य यंत्रणेने नोंदणी प्रमाणपत्र तसेच अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कारणे, पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाचे (पूर्व उपनगर) प्रमुख अभियंता एन. आर. खानोलकर यांनी या रुग्णालयाच्या ''ओसी''बाबत तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना दिलेला अहवाल, त्यातील अवैध बांधकामाचा मुद्दा याची चौकशी होणार असल्याचे सांगितले जाते आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages