ज्येष्ठांचे मृत्यू रोखण्यासाठी पालिकेचा अॅक्शन प्लॅन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2021

ज्येष्ठांचे मृत्यू रोखण्यासाठी पालिकेचा अॅक्शन प्लॅन


मुंबई - मुंबईत कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत असली तरी ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूत वाढ होत आहे. त्यामुळे सोमवारपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस देत ज्येष्ठांचे मृत्यू रोखण्यासाठी पालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. दरम्यान, बारा आठवडे झालेल्या ज्येष्ठांना सोमवारपासून कोव्हिशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तर ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कस आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ, ४५ वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांनंतर १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र डोसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी १८ वर्षांवरील सर्वांसाठी सुरू करण्यात आलेले लसीकरण थांबवण्यात आले असून सद्यस्थितीत केवळ ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात आहे. यामध्ये पालिका-राज्य सरकारच्या मिळून सुमोर ४० आणि चार खासगी लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत सर्व गटाचे मिळून सुमारे ३० लाख डोस देण्यात आले आहेत.

तीन दिवस नोंदणी, तीन दिवस वॉक इन -
सोमवारपासून होणाऱ्या लसीकरणात तीन दिवस कोविन अॅपवर नोंदणीने आणि तीन दिवस ‘वॉक इन’ पद्धतीने डोस देण्यात येणार आहेत. पहिले तीन दिवस ज्येष्ठ आणि दिव्यांगांना सोमवार, मंगळवार, बुधवार ‘वॉक इन’ पद्धतीने तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस ‘कोविन अॅप’वर नोंदणी केल्यानंतरच दिला जाणार आहे. तर ६० वर्षांवरील ज्येष्ठांना कोव्हिशिल्डचा पहिला डोस देण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. रविवारी लसीकरण बंद राहणार आहे.

आतापर्यंत ८ लाख ज्येष्ठांना डोस -
मुंबईत ११ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. यातील ८ लाख जणांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. कोरोनाचा धोका ज्येष्ठांना सर्वाधिक आणि कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता यामुळे या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण वेगाने करण्यात येणार आहे.

७० हजार लसींचा साठा -
गेल्या काही दिवसांत मुंबईत लसींचा तुटवडा जाणवत आहे. सध्या मुंबई महापालिकेकडे कोव्हिशिल्ड व कोवॅक्सीनचे ७० हजार लसीचे डोस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad