मुंबई - मुंबई महापालिकेच्या सन २०१७ च्या निवडणुकीत त्यावेळी असलेल्या भाजप सरकारने प्रभाग पुनर्रचना आपल्या सोयीची केल्याने भाजपच्या ४० ते ५० जागा वाढल्या. मात्र या जागांपैकी ४५ प्रभागांची पुनर्रचना संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रभागांच्या भौगोलिक पुनर्रचनेत सुधारणा करण्यात यावी. येत्या २०२२ च्या पालिका निवडणुकीपूर्वी यात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होत आहे. या निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला लागण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकीला ९ महिने शिल्लक असताना आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यात प्रभाग पुनर्रचनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वाद सुरु झाला आहे. यात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रभाग पुनर्रचनेवरून थेट राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांना पत्र पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
सन २०१७ मध्ये भाजपचे सरकार होते. यावेळी सरकारने पालिकेच्या २२७ जागांची पुनर्रचना करताना आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या सोयीप्रमाणे जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना केली. यात आपल्या पक्षाला कसा फायदा होईल, याकडे पाहिले. त्यामुळे भाजपला ४० ते ५० जागा अधिक मिळाल्या. ही बाब नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरूद्ध होती. तेव्हा काही नागरिकांनी हरकती आणि सूचनांमार्फत या पुनर्रचनेला विरोध करूनही त्यांना न्याय देण्यात आला नाही. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी केलेल्या ४५ प्रभागांच्या पुनर्रचनेत सुधारणा करून ही चूक दुरूस्ती करावी, असे रवी राजा यांनी या पत्रात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment