शिवसेना आमदाराने कंत्राटदाराच्या अंगावर कचरा ओतलामुंबई - मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचल्याने सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठत असताना शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी चक्क कंत्राटदारालाच कचऱ्याची आंघोळ घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागात पाणी साचले. तर लोकल सेवेवरही परिणाम झाला. पहिल्याच पावसात पाणी साचल्याने पालिकेचे १०० टक्के नालेसफाई झाल्याचे दावे पोल ठरले आहेत. सत्ताधारी शिवसेनाही प्रशासनाच्या नालेसफाईच्या दाव्यावर समाधान व्यक्त करत होती. पण पहिल्याच पावसात पाणी साचल्याने मुंबईची दाणादाण उडाल्याने शिवसेना आणि प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. पाणी तुंबण्यावरून वाद-प्रतिवाद सुरू असतानाच मुंबईतील शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कंत्राटदारावर कचऱा टाकला. हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला असून, या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

कुर्ल्यातील कमानी भागात व्यवस्थित नालेसफाई न झाल्याने या भागात पाणी तुंबले. त्यामुळे आमदार दिलीप लांडे चांगलेच संतापले. रागाच्या भरात त्यांनी कंत्राटदाराला खाली बसवले. त्यानंतर कार्यकर्त्यांना कंत्राटदारावर कचरा टाकायला सांगितला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर साचलेला कचरा त्याच्या अंगावर टाकला. यावेळी कंत्राटदार आमदारांशी बोलताना दिसत आहे. तसेच रस्त्यावर पाणी तुंबलेले असल्याचे आणि बराच कचरा साचलेलाही दिसत आहे.

Post a Comment

0 Comments