राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीची सात ठिकाणी छापेमारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2021

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीची सात ठिकाणी छापेमारी



मुंबई ३ सप्टेंबर २०२१ - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सात ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी मुंबई आणि मुंबईच्या बाहेर टाकण्यात आल्या आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात जे राजकीय नेते अडकले आहेत त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे नाव अग्रस्थानी आहे. या प्रकरणात लवकरच अनेक राजकीय नेत्यांना ईडीकडून समन्स जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं म्हटलं जातं होतं. या घोटाळ्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिक जाधव यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यात ईडीने जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला. यानंतर इतर साखर करखान्या बाबत ईडीचा तपास सुरु झाला आहे.

ईडीकडून याच अनुषंगाने धाडसत्र राबवण्यात आलं. ईडीकडून गुरुवारी सात ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यात. अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची आता छाननी सुरु आहे. यानंतर आता संबंधितांना समन्स पाठवून बोलावलं जाणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण कोर्टात अडकल्यानंतर ईडीने आता आपला मोर्चा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याकडे वळवला आहे. या बँक घोटाळ्यात सुमारे ७० वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे आली आहेत. यापैकी काही जणांची चौकशी झाली आहे. लवकरच इतर नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता ईडीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

आघाडी सरकारच्या काळात अजित पवार शिखर बँकेचे अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी को ऑप बँकेचे अध्यक्ष होते. त्या काळात या बँकेत कथित 25 हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तर जो जरंडेश्वर कारखाना अवसायनात निघाला, तो कवडीमोल भावाने विकल्याच आरोप आहे, तो कारखाना सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकाचा आहे. राजेंद्र घाडगे हे अजित पवारांचे मामा या बँकेचे चेअरमन आहेत. यांच्याच कार्यकाळात ईडीने या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad