पालिका निवडणुकीसाठी ६० हजार कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण  - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2021

पालिका निवडणुकीसाठी ६० हजार कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण 



मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Bmc Election) महापालिका कामाला लागली आहे. प्राथमिक तयारी, आदी नियोजन करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. वॉर्ड वाढणार असल्याने निवडणूक बूथसह निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. कर्मचा-यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण दिले जाईल. गेल्या पालिका निवडणुकीसाठी पालिकेचे ४५ ते ५० हजार कर्मचारी कार्यरत होते. २०२२ च्या निवडणुकीत ही संख्या आणखी १५ हजारांनी वाढणार आहे. त्यामुळे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ६० हजारांपर्यंत पोहोचेल. कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने निवडणूक कामासाठी प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार नाही. गर्भवती महिलांनाही या कामातून वगळण्यात येईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने पालिकेचे ९ प्रभाग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या २२७ प्रभागांची संख्या २३६ होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत २०२२ च्या पालिका निवडणुकीत बूथची संख्या ८,५०० वरुन ११,००० पर्यंत नेण्यात येणार आहेत. त्यामुळे, त्या अनुषंगाने निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. १२ प्रभागासाठी दोन निवडणूक अधिकारी नेमले जातील. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल. दरम्य़ान, गर्भवती महिलांना निवडणूक कामातून वगळण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिकेकडून निवडणुकीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात प्राथमिक प्रशिक्षण, दुसऱ्या टप्प्यात विस्तृत प्रशिक्षण आणि त्यानंतर ईव्हीएम यंत्राची हाताळणी आदींचा समावेश असेल असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

आदेशाची प्रतीक्षा -
राज्य सरकारकडून नगरसेवकांच्या वाढीव संख्येविषयी अद्याप पालिकेला आदेश प्राप्त झालेले नाहीत. मुंबईत नवीन प्रभागांचे सीमांकन होणार आहे. पालिकेकडून पुन्हा सर्व प्रभागांच्या सीमा लोकसंख्येनुसार निश्चित केल्या जातील. याबाबत निर्देश आल्यानंतर हे काम हाती घेतले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे त्यानंतर कच्चा अहवाल सादर केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad