भाजपा आशिष शेलारांच्या नेतृत्वात मुंबई महापालिका निवडणूक लढवणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 February 2022

भाजपा आशिष शेलारांच्या नेतृत्वात मुंबई महापालिका निवडणूक लढवणार



मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक संचालन समितीसह २५ समित्या स्थापन केल्या आहे. यातील प्रत्येक समितीचा अध्यक्ष आणि सदस्यपद देऊन जबाबदारी सोपवली आहे. आमदार आशिष शेलार यांच्याकडे निवडणुकीची मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक संचालन समितीचे अध्यक्षपदाची धुरा ते सांभाळणार आहेत. 
                
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने सत्ताधारी शिवसेनेला टक्कर देण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.  पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा भाजपची बैठक झाली. यात निवडणूक तयारीच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चर्चा करुन २५ समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जाहिर केली. यात माध्यम विभाग समिती अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची प्रशासन समन्वयपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर आचार्य पवन त्रिपाठी आणि आमदार विद्या ठाकूर यांच्याकडे विशेष संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवली आहे. महिला संपर्क समितीची जबाबदारी शलाका साळवी, शीतल गंभीर यांच्याकडे तर संजय पांडे यांच्याकडे प्रवाशी कार्यकर्ता समितीची जबाबदारी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad