मुंबईत एक तास बत्ती गुल, उच्चस्तरीय चौकशीचे उर्जामंत्र्यांचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 February 2022

मुंबईत एक तास बत्ती गुल, उच्चस्तरीय चौकशीचे उर्जामंत्र्यांचे आदेश



मुंबई - मुंबईत आज सकाळी वीजपुरवठा खंडीत झाला. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या भागात वीज गायब झाली. मुलुंडमधील ट्रॉम्बे येथील वीजपुरवठा करणारी टाटाची केबलमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त झक्यावर तासाभराने मुंबईमधील वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

मुलुंडमधील ट्रॉम्बे येथील वीजपुरवठा करणारी टाटाची केबलमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सकाळी ९.४५ वाजता वीजपुरवठा खंडीत झाला. मुंबईच्या बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत, टाटाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. एका तासात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आला. सीएसएमटी, भुलेश्वर, ताडदेव, परेल, सायन, वडाळा, अंटोप हिल, दादर, लालबाग, मस्जिद, वरळी, अशा विविध भागात एक तास वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे लोकल ट्रेन देखील ठप्प झाल्या आहेत.

उच्चस्तरीच चौकशी करणार- ऊर्जामंत्री
दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर स्वतः ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी 'ऍक्शन मोड'मध्ये येत सर्व संबंधित अधिकारी आणि टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात होते. "या घटनेची माहिती मिळताच मी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे तसेच महापारेषण व राज्य भार प्रेषण केंद्रातील प्रमुखांशी सतत संपर्कात होतो. वीज पूरवठा तात्काळ पूर्ववत व्हावा यासाठी मी त्यांना सूचना दिल्या आणि या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच टाटा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ही प्रत्यक्ष बोलून वीज पुरवठा तात्काळ सुरू होण्याबाबत चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन  प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करून अवघ्या ७० मिनिटात दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला,"असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे. "या प्रकरणाची गंभीर दखल मी घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर उचित कारवाई केली जाईल," असेही डॉ. राऊत यांनी जाहीर केले. वीज पुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य दिल्याने माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्यास विलंब झाला, असेही त्यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad