मुंबई - वरळीतील गॅस सिलिंडर स्फोट दुर्घटनेत वाचलेल्या विष्णू पुरी या लहान मुलाला सीएसआर निधी व महापौर किशोरी पेडणेकर यांच्यातर्फे पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. मंगळवारी कस्तुरबा रुग्णालयात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या मुलाच्या आजोबाकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार, वरळी येथील घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या विष्णु पुरी या लहान मुलाचे छत्र हरपल्याने आई वडीलाविना हाल-अपेष्टा होऊ नये म्हणून आर्थिक मदत करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला. त्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी, २२ फेब्रुवारी २०२२ रोजी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत विष्णूच्या आजोबाकडे सुपूर्द केली . यावेळी उप महापौर अँड. सुहास वाडकर, वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत पवार उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी संवाद साधतांना म्हणाल्या की, कस्तुरबा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवृंद यांनी घेतलेल्या मेहनतीला यश येऊन हे बाळ बरे झाले आहे. पाच ते सहा वेळा या बाळावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. त्यानंतर त्याची चांगली सुश्रुषा केल्याबद्दल महापौरांनी रुग्णालयातील सर्वांच आभार मानले.
विष्णूने आपले पुण्यातील आजोबा यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यानुसार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विष्णूच्या नावाने बँक खाते उघडण्यात आले आहे. ही संपूर्ण आर्थिक मदत या खात्यामध्ये जमा होणार आहे. विष्णू वयाची अठरा वर्षे पूर्ण करेपर्यंत त्याच्या देखभालीचा खर्च मिळणाऱ्या व्याजातून करण्यात येईल. त्यासोबतच विष्णूचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शिवसेना पक्ष करणार आहे. त्यासोबतच याव्यतिरिक्त दर महिन्याला सीएसआर मधून विष्णूला आर्थिक मदत करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रला पत्र देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. विष्णूला आई-वडिलांसारखंच प्रेम द्या, चांगला सांभाळ करा, तसेच आम्ही वेळोवेळी त्याला भेटून त्याची संपूर्ण काळजी घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
No comments:
Post a Comment