मुंबई - भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दि. २० मार्च १९२७ साली कोकणातील महाड येथे चवदार तळ्यावर झालेल्या सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या सत्याग्रह स्मृती दिनास यंदा ९५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्या सत्याग्रह दिनाचे स्मरण करावे आणि त्यानिमित्ताने लोक प्रबोधन व सांस्कृतिक जागृती करण्यासाठी, " दलित पँथर सुवर्णमहोत्सव समिती " तर्फे हा स्मृती दिवस संपूर्ण राज्य भर, सदर समितीशी संबंधित आंबेडकरी व पुरोगामी, समतावादी चळवळीतील कार्यकर्ते विविध कार्यक्रम घेऊन पाळणार आहेत.
त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून, मुंबई, ठाणे, पालघर,वसई, कल्याण, कर्जत, खोपोली, येथील दलित पँथर सुवर्णमहोत्सव समितीशी संबंधित कार्यकर्त्यानी काल सकाळी १० वाजता, पनवेल बस स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, "समता जागर रॅली"ला प्रारंभ केला. त्यानंतर वाटेत, युसुफ मेहरअली सेंटर, तारा, महात्मा गांधी वाचनालय, पेण, बौद्ध विहार, इंदापूर, माणगाव शहर, साने गुरुजी स्मारक येथे मुक्काम करून सकाळी गोरेगांव संबोधी बुद्ध विहार, दासगाव, कॉ. आर. बी. मोरे प्रागतिक माध्यमिक विद्यालय आदी ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चौक सभा करून, समता जागर रॅली महाड च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पोहोचणार आहे. सदर ठिकाणी दलित पँथर सुवर्णमहोत्सव समितीचे कोकणातील व वाई, सातारा, सांगली, कोल्हापूर चे कार्यकर्ते एकत्र जमा होऊन, मिरवणुकीने महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील. त्यानंतर रॅली ज्या ठिकाणी २५ डिसेंबर १९२७ ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले तेथे जाऊन क्रांती भूमीच्या स्तंभाला भेट देतील, तेथे सांस्कृतिक कार्यक्रम व सभा घेऊन रॅली चा समारोप होईल, असे दलित पँथर सुवर्णमहोत्सव समितीच्या कोअर कमिटी तर्फे कळविण्यात आले आहे.
कोअर कमिटीचे सदस्य शाम गायकवाड, सयाजी वाघमारे, गौतम जाधव, सुबोध मोरे, ॲड. नाना अहिरे, सुमेध जाधव, सुनील कदम, संध्या पानस्कर, ज्योती बडेकर, डॉ. स्वाती लावंड, रवी भिलाणे, अमोल निकाळजे, भानुदास धुरी हे आहेत.
No comments:
Post a Comment