वन्य पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कायापालट करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वन्य पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कायापालट करणार

Share This


मुंबई, दि. 11 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा चेहरा मोहरा बदलून याठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश वन विभागाला दिले. 

मुख्यमंत्री यांचे वर्षा या शासकीय निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय उद्याना विषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी ,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे सल्लागार सीताराम कुंटे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानक्षेत्र विकास, संचालक मल्लिकार्जुन, नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय एल पी राव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांना आकर्षित करणारे जगातील विविध उद्यानामधील पशु-पक्षी आणण्यासाठी प्रयत्न करावे. या उद्यानात पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईच्या नागरीकांना जगातील उत्कृष्ट उद्यानाचा आनंद घेता येईल असे उपक्रम याठिकाणी राबविण्यात यावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

विविध जातींचे सर्प संग्रहालय तयार करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. काळा बिबट्या असे आपल्याकडे दुर्मिळ असणारे प्राणी या उद्यानात आणावेत. तसेच वाघांची, बिबट्या सफारीचा उपक्रम राबविण्यात यावे. होलोग्राफिक प्रोजेक्शन असे उपक्रम या उद्यानात राबविण्यात यावेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रदूषणमुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने आणावीत. चिल्ड्रन पार्क, बोटिंग, अद्ययावत शौचालयाची सुविधा याठिकाणी करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages