मालमत्ता कराची रेकाॅर्डब्रेक ५ हजार ७९२ कोटी रुपयांची वसुली ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 April 2022

मालमत्ता कराची रेकाॅर्डब्रेक ५ हजार ७९२ कोटी रुपयांची वसुली !



मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ७०० कोटी रुपयांची वाढ झाली असून दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ५ हजार ७९२ कोटी २२ लाख ५० हजार रुपये इतके कर संकलन नोंदविण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या इतिहासातले आजपर्यंतचे हे विक्रमी करसंकलन ठरले आहे. १ जानेवारी २०२२ पासून मुंबईत ५०० चौरस फूटापर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. तरीही कर संकलनात झालेली घसघशीत वाढ पाहता करनिर्धारण व संकलन खात्याची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.
यंदा ३० टक्क्यांहून अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. यात प्रभादेवी विभागाने ३४.३४ टक्के इतकी वाढ नोंदवून अग्रस्थान पटकावले आहे. पालिकेच्या उत्पन्नाचा अत्यंत महत्त्वाचा स्रोत म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो. संबंधित नागरिकांनी वेळेत महानगरपालिकेकडे मालमत्ता कर जमा करावा, यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशाखाली महानगरपालिका प्रशासन मागील वर्षभर सातत्याने प्रयत्नशील होते. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही रुपये ५,७९२.२२ कोटी इतकी झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा कर संकलन ७०० कोटी ९३ लाख ६३ हजार रुपयांनी म्हणजेच १३.७७ टक्क्यांनी वाढले आहे. यंदाची कर वसुली महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. पालिका हद्दीतील ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱया निवासी इमारती, निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार गेल्या १ जानेवारी २०२२ पासून ही सवलत लागू करण्यात आली आहे. एकूण १६ लाख १४ हजार निवासी सदनिकाधारकांना त्याचा लाभ झाला आहे. सवलतीचा हा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवत आणि कर संकलनावर कोणताही विपरित परिणाम न होवू देता महानगरपालिका प्रशासनाने आपली कार्यक्षमता दाखवून दिल्याचा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंग चहाल यांनी केला आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुली ही रुपये ५ हजार ०९१ कोटी इतकी झाली होती. तर, त्याआधी म्हणजेच ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुली ही रुपये ४ हजार १६१ कोटी इतकी झाली होती, अशी माहिती सह आयुक्त सुनील धामणे यांनी दिली आहे.

262 कोटींची वाढ -
शहर विभागामध्ये मालमत्ता काराचीवसुली १७.५१ टक्के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी शहर विभागात १,४९६.१० कोटी रुपये कर प्राप्त झाला होता. तर यंदा १,७५८.२० कोटी रुपये करसंकलन झाले आहे. म्हणजेच २६२.०३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पूर्व उपनगरांमध्ये गतवर्षी १,०७०.७१ कोटी रुपये इतकी मालमत्ता कर वसुली झाली होती. तर यंदा १,१८८.१६ कोटी रुपये कर जमा झाला आहे. एकूण ११७.४४ कोटी रुपयांची अर्थात १०.९७ टक्के इतकी वाढ झाली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये गतवर्षी २,५२२.३८ कोटी रुपये कर मिळाला होता. तर यंदा २,८४०.०४ कोटी रुपये कर महानगरपालिकेकडे जमा झाला आहे. ही वाढ ३१७.६५ कोटी रुपयांची अर्थात १२.५९ टक्के इतकी आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad