राज ठाकरेंच्या आवाहनानंतर हनुमान चालीसा लावणारा मनसे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यातमुंबई - राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आवाहनानंतर घाटकोपर चांदिवली येथे मनसेच्या कार्यलयावर स्पीकर लावून हनुमान चालीसा सुरु करण्यात आला. याला पोलिसांनी आक्षेप घेतला असून हनुमान चालीसा स्पीकरवर सुरु करणारे मनसे घाटकोपर शाखा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून स्पीकर ताब्यात घेतले आहेत. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील (masjid) बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या दादर शिवाजी पार्क येथील सभेत दिला होता. त्यानंतर घाटकोपर पश्चिम चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला. दिवसभर हनुमान चालिसा लावण्यात येणार असल्याचं भानुशाली यांनी सांगितलं. राज ठाकरे यांचा आदेश कार्यकर्ता म्हणून पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आजपासून सुरूवात केली आहे. रोज भोंगे वाजणार असून त्यावर हनुमान चालिसा, गायत्री मंत्र, गणपतीची आरतीसह हिंदू धर्माशी निगडीत सर्व आरत्या या ठिकाणी वाजणार असल्याचे भानुशाली यांनी सांगितले. 

स्पीकरवर हनुमान चालीसा लावल्याने दोन धर्मियायांमध्ये तणाव निर्माण होणार नाही का याबाबात बोलताना, तणाव कशाला होणार? हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यांची अजान होते. त्याने तणाव झाला का? नाही ना? हिंदू धर्माची आरती वाजली तर तणाव का? असा प्रश्नच का? आम्ही आमच्या धर्माचा प्रसार करतो, असं  भानुशाली यांनी सांगितलं. 

दरम्यान, याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मनसेच्या कार्यालयावर स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणारे महेंद्र भानुशाली यांना घाटकोपरच्या चिराग नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच स्पीकर व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

Post a Comment

0 Comments