प्रभाग रचना अंतीम होताच इच्छुक लागले कामाला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 May 2022

प्रभाग रचना अंतीम होताच इच्छुक लागले कामालामुंबई - मुंबई महापालिका प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब करताच इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे. अनेक माजी नगरसेवक व इतर इच्छुकांनी प्रभागात भेटीगाठी वाढवण्यास सुरुवात केली आहे. नव्या सीमांकनामध्ये वॉर्डाचा काही भाग विभागला गेल्याची शक्यता असल्याने अनेकजण धास्तावलेही आहेत. त्यामुळे प्रभाग रचना समजून घेण्यावर इच्छुकांनी तसेच राजकीय पक्षांनी भर दिला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रभागाच्या अंतिम फेररचनेवर शुक्रवारी शिक्कामोर्तब केल्याने मुंबईत नवे ९ प्रभाग वाढल्याचे निश्चित झाले आहे. प्रभागांची संख्या आता २२७ वरून २३६ झाली आहे. त्यामुळे पालिका निवडणूक कधी याच्या प्रतीक्षेत असलेल्या राजकीय पक्ष तसेच इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. सीमांकनात प्रभागांची मोडतोड झालेली असल्याने आपला मतदार दुस-या प्रभागात फेकला गेला नसेलना याची धाकधूक माजी नगरसेवक, इच्छुकांमध्ये वाढली आहे. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेची चाचपणी करण्यावर त्यांनी भर दिला आहे. 

नवीन ९ प्रभागांचा कोणाला फायदा व तोटा होणार याचा आढावा घेण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षही कामाला लागले आहेत. काही पक्षांनी याची खास मानसे नेमून त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. नव्या प्रभाग रचनेचा अभ्यास करून मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी ९ प्रभाग वाढल्याने या नवीन प्रभागांचा फायदा तोटा कोणाला होणार याचाही अंदाज घेणे सुरु झाले आहे. आयोगाने प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केल्याने निवडणुकीच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. दरम्यान निवडणूक कधी असेल याबाबत येत्या १७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींनी वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

मुंबई महापालिकेत मागील अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता होती. यात काही वर्ष भाजप शिवसेनेसोबत सत्तेत एकत्र होते. यावेळी मात्र पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप कट्टर विरोधक असणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने पालिकेतील भ्रष्टाचारावर रान उठवण्यास सुरुवात केली आहे, तर शिवसेनेने विकास कामांचा धडाका सुरु ठेवला आहे. विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवसेना कामाला लागली असून अनेक ठिकाणी भूमीपूजने, उद्घाटने सुरु केली आहेत. शिवसेनेसोबत राज्याच्या सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची रणनिती मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या १७ मे नंतर निवडणूक कधी हे स्पष्ट झाल्यावर पालिका निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad