Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पावसात अडकलेल्या मुंबईकरांसाठी बस, एसटी सुविधा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबई - मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना कामाच्या ठिकाणी, रेल्वे स्थानकावर अडकून राहावे लागते. अशा ठिकाणी बेस्ट बसेस, एसटी व आवश्यक सुविधा उपलब्ध केल्यास प्रवाशांची गैरसोय दूर करता येतील. मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच मुख्य सचिव यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विभागवार अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या अडकलेल्या मुंबईकरांची चहा नाश्त्याची व्यवस्था करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रवाशांना कोणताही त्रास होता कामा नये याच उद्देशातून सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यंदा चांगले काम केले असल्यामुळेच मुंबईत पाणी साचून राहिले नाही. पाण्याचा लवकर निचरा झाला. मुंबईत हमखास पाणी साचणाऱ्या हिंदमाता तसेच सायन याठिकाणी पाणी साचून राहिलेले नाही. महापालिका प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाचे हे यश असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेने होल्डिंग पॉंड, जेट पंप यासारख्या उपाययोजनातूनच पाणी साचणारी ठिकाणे कमी करण्यात यश मिळवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

मुंबईत पाणी साचणाऱ्या २५ फ्लडिंग स्पॉटच्या ठिकाणी यंत्रणा अंमलात आणण्याचे आदेश महापालिका आय़ुक्तांना दिले आहेत. त्याठिकाणी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरची नेमणूक करावी. तसेच मुंबईकरांची व्यवस्था याठिकाणी करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांची असणार आहे. पावसात खोळंबा होऊ नये म्हणून नागरिकांसाठी चहा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात यावी असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. पालिकेच्या कामाचे कौतुक करताना मागील सरकारच्या कामाबाबत बोलण्यास मात्र त्यांनी टाळले.

चार हजार नागरिकांचे स्थलांतर -
राज्यात तब्बल चार हजार नागरिकांचे पावसाच्या परिस्थितीमुळे स्थलांतर करण्यात आले आहेत. कोकणासाठी बुधवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच दरडग्रस्त भागात काळजीसाठी नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एकूण चार हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. रायगड, रत्नागिरी याठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पूर परिस्थितीच्या भागात मुख्य सचिव तसेच पालक सचिव यांना नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

येत्या काळात रस्त्यांचा दर्जा सुधारणार -
मुंबईत पाणी साचून राहिले नसले तरी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यापुढे नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी विविध उपायय़ोजना केल्या जाणार आहेत. रस्त्यांच्या अनुषंगाने भविष्यासाठी कॉंक्रिट रोड बांधण्याचा मानस आहे. दुसरीकडे रस्त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाटीही प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या कोल्डमिक्सचा वापर करून रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

पालिकेच्या कामाचे कौतुक -
मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी पहिल्यांदाच महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. तेथे बसून संपूर्ण मुंबईची परिस्थिती लक्षात येते आणि त्याप्रमाणे सूचना देता येतात किंवा उपाययोजना सुचविता येतात या सुविधेमुळे मुख्यमंत्री प्रभावित झाले. ते म्हणाले चांगले काम असेल तर त्याला चांगलेच म्हटले पाहिजे. आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. मुंबईच्या हिंदमाता परिसरात पाऊस पडून गेला तरी नेहमी पाणी साचलेले असायचे. पण तेथे भूमिगत टाक्यांप्रमाणे ज्या काही उपाययोजना करण्यात आल्या, त्यामुळे तेथे आता पाणी साचून राहत नाही. एवढा पाऊस होऊनही मुंबईत पाणी साचण्याची ठिकाणेही कमी असल्याचे शिंदे म्हणाले. एकीकडे न झालेली नालेसफाई, रस्त्यांची खराब कामे याविषयी भाजपकडून पालिकेला लक्ष्य केले जात असताना मुख्यमंत्र्यांकडून चांगल्या कामाचे म्हणजे शिवसेनेचेच कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom