मुंबईत कोसळधार, सखल भागात पाणी साचले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2022

मुंबईत कोसळधार, सखल भागात पाणी साचले


मुंबई - मुंबईत संततधार कोसळणा-या पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले. दादर टीटी, सायन येथील गांधी मार्केट, अंधेरी सबवे परिसरांना तलावाचे स्वरुप आले होते. त्यामुळे वाहतूकही वळवण्यात आली. जोरदार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला. सायन येथे रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक कोलमडली. लोकल तासाभराने उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल झाले. मुंबई शहर व उपनगरांत १६० मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर येथे पावसाचा यलो अलर्ट जाहिर केला आहे.

मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच जोरदार कोसळणा-या पावसाने मंगळवारीही संततधार कायम ठेवली. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले. चेंबूर, कर्ला, सायन येथील गांधी मार्केट, दादर टीटी, हिंदमाता, चुनाभट्टी, वांद्रे, बीकेसीत पाणी साचले. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने हा सबवे बंद ठेवण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली. सकाळी १० नंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे रेल्वे वाहतूकही कोलमडली. सायन रेल्वेस्थानकातील रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तासभर उशिराने धावत होत्या. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने काही लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सर्व रेल्वेस्थानकावर मोठ्या तुफान गर्दी झाली. प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागला. लोकल तासभर विलंबाने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले. जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूकही खोलंबल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक जाम झाल्याने प्रवाशांना अडकून पडावे लागले. हिंदमाता येथेही पाणी साचले. मात्र दरवर्षीप्रमाणे काही तास पाणी साचून न राहता त्याचा काही वेळातच निचरा झाला. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने हा सबवे बंद ठेवण्यात आला. त्यामुळे येथील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. दादर टीटी, चेंबूर शेल कॉलनी, गांधी मार्केट येथे पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आले होते. मुंबई महापालिकेने सखल भागात पाणी साचणा-या ठिकाणी आपली यंत्रणा सतर्क केली होती. पाणी साचलेल्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा करण्यात आला. हिंदमाता येथे थोडा पाऊस पडला तरी तासनतास तुंबून राहणा-या पाण्याचा यंदा मात्र काही वेळातच निचरा झाला. पाण्याचा निचरा करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा केलेल्या कामांचा यंदा फायदा होताना दिसतो आहे. झाडे उन्मळून किंवा झाडांच्या फांद्या कोसळण्याचे प्रमाण यंदाच्या पावसांतही कायम राहिले आहे. मंगळवारच्या संततधार पावसांत विविध ठिकाणी झाडे, घरांच्या भिंतींच्या पडझडीच्या घटना घडल्या. यात कोणीही जखमी झालेले नाही. दुपारनंतर पावसाने रिप रिप ठेवत काहीशी उसंत घेतली. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा झाला.

समुद्रात ४.१० मीटरची भरती -
सकाळपासून जोरदार पावसाने झोडपल्यानंतर दुपारनंतर काहीशी उसंत घेतल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. दुपारी चार वाजता समुद्रात ४.१० मीटरची भरती होती. यावेळी मुसळधार पाऊस कोसळला असता तर शहरात पाणी साचले असते. मात्र यावेळी पाऊस थांबल्याने पाणी तुंबले नाही.

येथे पाणी साचले-
दादर टीटी, सायन, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, वडाळा, चेंबूर शेल कॉलनी, अँटोप हिल, विक्रोळी, कुर्ला, चुनाभट्टी, अंधेरी सबवे, बीकेसी, वांद्रे, बोरिवली, धारावी आदी ठिकाणी पाणी साचले.

घरावर झाड कोसळले -
विक्रोळी पंचशील नगर साई प्रसाद सोसायटी येथे सकाळी एक झाड घरावर पडल्याने घराची भिंत कोसळली. हे घर आधीच खाली करण्यात आले होते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना झालेली नाही.

बेस्ट मार्ग वळवण्यात आले -
मुंबई शहर व उपनघरात सखल भागात पाणी साचल्याने ठिकठिकाणी बस मार्ग वळवण्यात आले. सायन येथील रोड नंबर २४ साधना विद्यालय येथे पाणी साचल्याने येथून बस मार्ग ७ मर्या , २२ मर्या , २५ मर्या , ए २५ , २७ , १७६ . ३०२ , ३१२ , ३४१ , ए ३४१ , ४११ आदी बसमार्ग सायन येथील रोड क्र ३ मार्गे वळवण्यात आले . तर शेल कॉलनी चेंबूर येथे पाणी साचल्यामुळे बसमार्ग ३५५ मर्यादित, ए ३५७ व ३६० या बसेस चेंबूर नाका आचार्य उद्यान आंबेडकर उद्यान मार्गे वळवण्यात आले . महेश्वरी उद्यान येथे पाणी साचल्यामुळे बसमार्ग ए ५ , ७ मर्या . ८ मर्या . ९ , सी १० , ११ मर्या . ए १९ , ए २१ , २२ मर्या , ए २५ , ६३ , ६६ . ६७ . ए ८५ . ए ९२ , १६९ , ए १७१ , ३५१ , सी ३०५ , ३५४ , ए ३५७ , ए ३८५ , ए ३६८ , ४११ , सी ५२१ या बसेस माटुंगा मार्गे वळवण्यात आल्या.

अलर्ट म्हणजे काय -
ग्रीन अलर्ट –
कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे.

यलो अलर्ट –
पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात येतो.

ऑरेंज अलर्ट –
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

रेड अलर्ट –
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येते. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad