दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, मोठ्या संख्येने जमा व्हा - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, मोठ्या संख्येने जमा व्हा - उद्धव ठाकरे

Share This


मुंबई - विजयादशमीनिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत येतात. मात्र, यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चढाओढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने जमा व्हा, असे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील विभाग प्रमुखांची बैठक घेत आगामी दसरा मेळाव्यावर चर्चा केली. यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, यावर्षी होणारा दसरा मेळावा विशेष असणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील शिवसैनिक पेटून उठला आहे. शिवसैनिकांच्या अंगात वेगळे तेज आलेले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत अत्यंत संयमाची भूमिका घेतली. आपण जे काम यापूर्वी करत आलो आहोत, तेच काम करायचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले, अशी माहिती एका शिवसेना कार्यकर्त्याने दिली.

शिवसैनिकांना केले मार्गदर्शन -
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काय मार्गदर्शन केले, याचीही माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. या बैठकीत महत्त्वाच्या दोन विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये २१ तारखेला गटप्रमुख आणि उपशाखाप्रमुख यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यावर बैठकीत चर्चा झाली. शिवाजी पार्कवर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. हे दोन्ही मेळावे चांगले व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहिजे. त्याच अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी, असे या बैठकीत सांगण्यात आले, अशी माहिती शिवसैनिकांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages