मुंबईत १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहीम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2022

मुंबईत १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहीम



मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवारी, १८ सप्टेंबर २०२२ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शुक्रवार, २३ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणा-या मोहिमेदरम्यान ५ वर्षे वयाखालील अंदाजे ८ लाख ९० हजार ४२५ बालकांना लस देण्याचे लक्ष्य असणार आहे. यासाठी दिवसा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ५ हजार कर्मचा-यांचा चमू कार्यरत राहणार आहे. स्थलांतरित-बेघर बालकांच्या लसीकरणाकरीता रात्रीच्या वेळी कर्मचारी कार्यरत राहतील. या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

केंद्र व राज्यशासनाच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सन १९९५ पासून विशिष्ट महिन्यातील रविवारी आणि त्यापुढील पाच दिवस घरोघरी जाऊन पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबविल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारत देशास सन २०१४ पासून पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले आहे. परंतु, सन २०२२ मध्ये जगभरातील काही देशांमध्ये १९ पोलिओ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शेजारी असणा-या पाकिस्तानमध्ये १४, तर अफगाणिस्तान मध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. तसेच मोझांबिक या देशात ४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पोलिओमुक्त झालेल्या देशांनी देखील योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत एकूण १३४ पल्स पोलिओ लसीकरण मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर येत्या रविवार १८ सप्टेंबर २०२२ रोजी पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत येत्या रविवारी लसीकरण बूथवर पाच वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात येतील. तसेच त्यानंतर पुढील पाच दिवस पल्स पोलिओच्या दिवशी ज्या बालकांना डोस पाजायचा राहून गेला असेल, त्यांना घरोघरी भेटी देऊन प्रत्येकी २ स्वयंसेवकांच्या लसीकरण चमुतर्फे पोलिओ डोस पाजण्यात येणार आहेत.

एकूण ४ हजार ८२१ बूथ कार्यरत राहणार -
मोहिमेत पाच दिवसांत लसीचे उदिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी एकूण ४ हजार ८२१ बूथ कार्यरत ठेवले जाणार आहेत. ३२२ ट्रान्झिट चमू विविध रेल्वे स्थानके, उदयाने, विविध पर्यटन स्थळे आदी ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत कार्यरत असतील. विविध बांधकाम स्थळांवरील स्थलांतरित बालकांचे लसीकरण करण्यासाठी ४३ चमू दिवसा कार्यरत असतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad