महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना पाच महिन्यानंतर मिळणार गणवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2022

महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना पाच महिन्यानंतर मिळणार गणवेश



मुंबई - शैक्षणिक वर्षाला सुरूवात होऊन पाच महिने उलटल्यानंतर अखेर मुंबई महापालिकेच्या शाळांतील मुलांना (Bmc school students uniform) गणवेश मिळणार आहे. सोमवारपासून शाळांमध्ये गणवेश वाटपासाठी सुरूवात झाली आहे. धारावीतील पहिल्या शाळेमध्ये आज गणवेश पोहचल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील काही वॉर्डांच्या शाळांमध्येही हे गणवेश उपलब्ध होणार आहेत. यंदा पालिकेच्या शाळांमध्ये नव्या रंगाचे नवीन गणवेश उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गणवेशाची प्रतिक्षा आता संपणार आहे.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. यंदा १३ वर्षानंतर नवीन रंगातील गणवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे डिझाईन तसेच तांत्रिक अडचणींमुळे गणवेश उपलब्ध करून देण्यात उशीर झाला. यंदाच्या वर्षी गणवेश तयार करणारे कारागिर वेळेत उपलब्ध न झाल्यानेच मोठ्या प्रमाणात गणवेश शिवण्यासाठी उशीर झाला. त्यामुळेच यंदा गणवेश उशिराने उपलब्ध होणार आहेत. परंतु गणवेश पुरवठा करण्यासाठीची पहिली डिलिव्हरी सोमवारी झाल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली. येत्या दिवसांमध्ये हे गणवेश सर्व शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी दिली.

पालिकेच्या धारावीतील शाळेमध्ये सोमवारी गणवेश वाटप करण्यात आले आहेत. मंगळवारपासून पालिकेच्या ए, बी, सी, डी व ई या विभागातही गणवेश उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. दिवाळीच्या सुट्टीच्या तोंडावरच अनेक शाळांमध्ये गणवेशाचे वितरण होणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध होणार आहेत. मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये दिवाळीनंतरच आता नव्या गणवेशातील विद्यार्थी पहायला मिळतील. पालिकेकडून देण्यात येणाऱ्या २७ मोफत वस्तुंपैकी एक असा गणवेशाचाही समावेश आहे. यंदा पालिकेच्या शाळेच्या गणवेशाचा रंग बदलण्यात आला. यंदा गणवेशाची रंगसंगती बदलल्यानेच तसेच नवीन गणवेश शिवण्यासाठी लागणारा वेळ पाहता यंदा पालिकेच्या गणवेश वितरणात उशीर झाला असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad