भाडे नाकरणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकावर कारवाईचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2022

भाडे नाकरणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकावर कारवाईचे आदेशमुंबई - १ ऑक्टोबरपासून मुंबईसह अन्य शहरात रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लागू करण्यात आली. यामध्ये रिक्षाचे भाडे २ रुपयांनी, तर टॅक्सीच्या भाड्यात ३ रुपयांनी वाढ करण्यात आली. यानंतर प्रवाशांची लूट, प्रवासी- चालक यांच्यातील वाद थांबतील असे वाटत असतानाच जवळचे भाडे नाकारत रिक्षा-टॅक्सी चालकांकडून प्रवाशांच्या त्रासात भर टाकण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांकडून शहरातील प्रत्येक वाहतूक विभागाला देण्यात आले असून सहपोलीस आयुक्त (वाहतुक) राजवर्धन सिन्हा यांनी हे आदेश १७ ऑक्टोबर रोजी दिले आहेत.

जादा भाडे आकारणे, नियमांचे उल्लंघन करत जादा प्रवासी वाहतूक करणे, सुट्ट्या पैशांवरून प्रवाशांशी वाद घालणे अशा अनेक तक्रारी मागील अनेक महिन्यांपासून वाहतूक पोलिसांकडे येत होत्या. अशातच रिक्षा व टॅक्सी चालक हे लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी अनेकदा नजिकचे भाडे नाकारत असल्याबाबतच्या तक्रारी देखील वाहतूक पोलिसांना येऊ लागल्या आहेत. या अनुषंगाने सोमवार १७ ऑक्टोबर रोजी वाहतूक विभागाची मासिक आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रभारी पोलीस निरीक्षकांना नजिकचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच भाडे नाकारणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याबाबतचे फलक रेल्वे व बस स्थानकाबाहेर दर्शनी भागावर लावण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. यासोबत सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी आपल्या वाहतूक विभागातील रिक्षा व टॅक्सी चालक यांच्या संघटनांशी संपर्क साधून बैठकीचे आयोजन करावे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालक यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागण्याबाबत व भाडे न नाकारण्याबाबत समज देवून त्यांचे प्रबोधन करण्याच्या सूचनाही वाहतूक पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad