कर्नाक पूल पाडकामादरम्यान बेस्ट जादा बस सोडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 November 2022

कर्नाक पूल पाडकामादरम्यान बेस्ट जादा बस सोडणार


मुंबई - मध्य रेल्वेवर (Central Railway) मस्जिद आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान असलेला १५४ वर्ष जुना कर्नाक पुल (Carnac Bridge) धोकादायक झाल्याने पाडला जात आहे. यासाठी आज शनिवारी रात्रीपासून रविवार रात्रीपर्यत २७ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान भायखळा, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे सेवा बंद राहणार आहे. याकालावधित प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बस चालिवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने (Best Bus) दिली.

सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यानचा ब्रिटिशकालीन कर्नाक पूल शनिवार १९ नोव्हेंबरच्या रात्रीपासून तोडण्याचे काम सुरु केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत शनिवारी रात्रीपासून रविवारी, २० नोव्हेंबरपर्यत २७ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल वाहतुक पूर्ण बंद राहणार असल्याने या मार्गावर एकही लोकल धावणार नाही. तसेच लांब पल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार असल्याने रेल्वेने ३६ मेल-एक्सप्रेस रद्द केल्या आहेत. काही गाड्या दादर, पनवेल पर्यतच चालविण्यात येणार आहेत. प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने बेस्ट प्रशासनाला जादा बस चालविण्यास सांगितले आहे. 

प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रम आज शनिवार रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ६.३० वाजेपर्यत १२ जादा बस चालविणार आहे. तसेच आणखी  सात प्रमुख मार्गांवर रविवारी आणखी ३५ बस सोडण्यात येणार आहेत. आज शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी साडे सहा वाजेपर्यंत, सीएसएमटी - वडाळा, सीएसएमटी - दादर आणि भायखळा (प) - कुलाबा (प्रत्येक मार्गावर चार अतिरिक्त बस) यासह तीन मार्गांवर १२ जादा बसेस बेस्टकडून चालवल्या जातील. तसेच रविवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यत इलेक्ट्रिक हाऊस- वडाळा (प), सीएसएमटी- धारावी डेपो, मुखर्जी चौक- प्रतीक्षा नगर, मंत्रालय- माहुल, इलेक्ट्रिक हाउस- के सर्कल आणि अँटॉप हिल- कोतवाल उद्यान या मार्गावर ३५ जादा बस सोडण्यात येणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad