Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

Mahaparinirvan Day - प्रज्ञासूर्याला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला


मुंबई - डोक्यावर निऴी टोपी, हातात झेंडा, काखेला सामानाची बॅग अडकवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने (Mahaparinirvan Day) लाखोंच्या संख्येने निळ्य़ा लाटा चैत्यभूमीच्या (Chaitybhumi) दिशेने धडकल्या आहेत. देशाच्या कानाकोप-यातून तीन दिवस आधीपासूनच लाखोंच्या संख्येने आलेल्या छोट्या तान्हुल्यापासून ते वयोवृध्दांपर्यंत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रांगा लागल्या आहेत. प्रज्ञासूर्याला  अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर  जनसागर लोटला आहे.

महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून लाखोंच्या संख्येने आलेल्या कष्टक-यांसह विविध स्तरातील लोकांच्या उपस्थितीने चैत्यभूमीची चैतन्यभूमी झाली आहे. जबतक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशा घोषणांनी चैत्यभूमी परिसर दणाणून गेला आहे. चैत्यभूमीच्या दिशेने येणारे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी- शिवाजी पार्कच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे लाखो भीमसैनिक पोलिसांना सहकार्य करताना दिसत आहेत. तीन दिवस आधीपासूनच जनसागर लोटला आहे. खेडोपाड्यातून आलेले भीमसैनिक शिवाजी पार्क परिसरात मिळेल त्या जागेत थंडी -वा-य़ात कुटुंबांसह मुक्कामास आहेत. मात्र चेह-यांवर थकव्याचा लवलेशही दिसत नाही. अनेक सामाजिक संस्था, संघटनांकडून मोफत भोजनदान करण्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली  आहे. चैत्यभूमी परिसरात प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिर, क्रांती गीतांच्या कॅसेटस आणि ध्वनीफिती, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या साहित्यांचे स्टॉल्स, महामानवाच्या प्रतीमा व पुतळे खरेदी करण्यासाठी स्टॅालवर गर्दी उसळली आहे. लाखोंच्या संख्येने महामानवाला अभिवादन करण्यासाठी छोट्या लेकरांसह ८० वर्षाच्या वृध्दांपर्यंत सा-यांनीच अभिवादनासाठी रांगा लावल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून उत्तमरित्या सोयी -सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.  

दादर रेल्वे स्टेशन ते शिवाजीपार्क - चैत्यभूमीपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या सुविधाही पुरेसा पुरवण्यात आल्य़ाने अनेकांनी समाधान व्यक्त केले. चैत्य़भूमी व शिवाजीपार्क परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौत्तम बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूमहाराज, संत कबीर, यांच्यावरील साहित्यांनी स्टॉल सजले आहेत. आंबेडकर, गौत्तम बुध्द यांच्या प्रतीकृती, छायाचित्रांचे स्टॅाल्सही लावण्यात आले आहेत. मागील दोन - तीन दिवसांपासून येथे मुक्कामास असलेल्यांना विविध सामाजिक संस्था, संघटना, बँका, लोकप्रतिनिधींनी अल्पोहार व जेवणाची व्यवस्था केली आली आहे. अभिवादनासाठी जवळपास पाच ते सहा तास रांगेने उभ्या असणा-या अनुयायांना पिण्याच्य़ा पाण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याठिकाणी पोलिस कर्मचारी आणि समता सैनिक दल तैनात करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनानेही दादर रेल्वे स्टेशन ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केला आहे. त्यामुळे रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला आहे. बाबासाहेबांच्या विचारांच्या क्रांतीच्या गीतांनी अवघा चैत्यभूमी ते शिवाजीपार्कचा परिसर दणाणून गेला आहे. दादर रेल्वेस्थानक ते चैत्यभूमी, शिवाजीपार्कपर्यंत अभिवादनाचे फलक लागले आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom