मुंबई - मुंबईत स्वच्छ्ता राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार, संपूर्ण मुंबईसाठी ५ हजार स्वच्छतादूत नेमले जाणार आहे. हे स्वच्छतादूत कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत, तर देखरेख व जागरुकतेवर भर देणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेला मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना, प्रधानमंत्री स्व-निधी योजना, माझी मुंबई – स्वच्छ मुंबई मोहीम आदींचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त - प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त तसेच बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत जी - २० परिषदेच्या मुंबईतील पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरी सेवा-सुविधांची कामे व सुशोभीकरण अत्यंत वेगाने केले, त्याबद्दल नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जी – २० मधील भारताचे शेरपा अमिताभ कांत यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. हीच धडाडी व वेग कायम ठेऊन आता सर्व उपक्रमांमध्ये निश्चित केलेले लक्ष्य गाठावे, असे निर्देशही चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत. यासाठी संपूर्ण मुंबईसाठी ५ हजार स्वच्छतादूत नेमले जाणार असून त्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेत आमूलाग्र बदल दिसून येईल. असेही डॉ. चहल यांनी नमूद केले आहे.
हे दिले निर्देश -
- मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत होत असलेल्या कामांच्या अंमलबजावणीचा विभाग कार्यालय स्तरावर दर आठवड्याला तर परिमंडळ स्तरावर दर पंधरवड्याला आढावा घ्यावा. सुशोभीकरण अंतर्गत होणा-या कामांची प्रगती व गुणवत्तेवर लक्ष ठेवावे.
- पाच हजार स्वच्छतादूत नेमायचे असून प्रत्येक १० स्वच्छतादूतांमागे १ पर्यवेक्षक नियुक्त करावा. हे स्वच्छतादूत क्लीनअप मार्शलप्रमाणे दंडात्मक कारवाई करणारे नसतील, दिलेल्या भागात दैनंदिन स्वच्छता, कचरा संकलन देखरेख करतील तसेच जनजागृतीसाठी मदत करतील.
- मुंबईत जिथे-जिथे अरुंद वसाहती, गल्ली तसेच झोपडपट्टी आहेत, त्या परिसरांमध्ये प्रखर दिवे (हायमास्ट) लावावेत. मुंबईत मिळून किमान ५०० हायमास्ट येत्या ३ महिन्यात उभारावेत
- आवश्यक आहे, तिथे नवीन प्रसाधनगृहे बांधण्याची कार्यवाही सुरु करावी. त्याचप्रमाणे खास व फक्त महिलांसाठी राखीव असलेली व सर्व सुविधांयुक्त किमान २०० प्रसाधनगृहे मुंबईत तयार करावीत.
- प्रधानमंत्री स्व-निधी योजना अंतर्गत फेरीवाल्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मार्च २०२३ अखेरपर्यंत एकूण २ लाख उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.
No comments:
Post a Comment