
मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट सज्ज झाली आहे. चैत्यभूमी, शिवाजीपार्क ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहापर्यंत विविध सोयी- सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच मुंबई परिसरातील व बाहेर गावावरून येणा-या अनुयायांसाठी ५ ते ७ डिसेंबर पर्यंत चैत्यभूमी फेरी ही विशेष बससेवा व मुंबई दर्शन उपलब्ध केले जाणार आहे. तसेच मंडप व उभारण्यात आलेल्या तंबूना वीज पुरवठा, दिव्यांच्या देखभालीसाठी एरियल लिफ्ट व वॉकीटॉकीने सुसज्ज असलेली पथके तैनात करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे देशाच्या कानाकोप-यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. बेस्ट उपक्रमाकडून ५ डिसेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत विविध सोयी - सुविधा उपलब्ध केल्या जातात. यंदाही बेस्ट यासाठी सज्ज झाली आहे. मुंबई परिसरातून तसेच बाहेरगावाहून येणा-या प्रवाशांसाठी दादर स्थानक ते शिवाजीपार्क मैदान- चैत्यभूमी येथे जाण्याकरीता चैत्यभूमी फेरी या नावाने अतिरिक्त बसफे-या चालवल्या जाणार आहेत. तसेच बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातर्फे विविध ठिकाणी मार्गप्रकाश दिवे बसवण्यात येणार आहेत. चैत्यभूमी ते शिवाजीपार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह, आंबेडकर कॉलेज, दादासाहेब फाळके रोड व मादाम कामा रोड आदी ठिकाणी १५० वॅटचे ३५५ व २ केव्हीचे ४ अतिरिक्त दिवे बसविले जाणार आहेत. अखंडीत वीज पुरवठा ठेवण्याकरीता बेस्टकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.
दादर स्थानकावरून चैत्यभूमीफेरी -
मुंबई परिसरातून तसेच बाहेरगावाहून येणा-या प्रवाशांसाठी दादर स्थानक ते शिवाजीपार्क मैदान- चैत्यभूमी येथे जाण्याकरीता चैत्यभूमी फेरी या नावाने अतिरिक्त बसफे-या चालवल्या जाणार आहेत. ५ डिसेंबर दुपारी ४ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत तीन बसेस तर ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ रात्री १० वाजेपर्यंत तसेच ७ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी दोन वाजेपर्यंत तीन बसेस चालवण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त सोमवारी, ५ डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते मध्यरात्रीपर्यंत बसक्रमांक २००, २४१, ३५१ व ३५४ वर १० बसगाड्या चालवण्यात येतील. तर ६ डिसेंबर रोजी बसक्रमांक ४४०, सी-३३, १६४, २४१, सी ३०५, ३५१, ३५४, अे- ३८५ आणि सी ५२१ या बसमार्गावर एकूण ३५ जादा बसगाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.
१५० रुपयांत मुंबई दर्शन -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मृतीस्थळांना व दक्षिण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याकरीता बेस्टने बुधवारी, ७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत अरिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार आहेत. शिवाजी पार्क येथून ६ अतिरिक्त बसगाडया सोडल्या जाणार आहेत. या बसगाड्यांचे प्रतीप्रवासी १५० रुपये प्रवास भाडे असेल. तसेच नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर येथील विविध भागांना भेट द्यावयाची असल्यास त्यासाठी दैनंदिन बसपासची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सदर पासचे शुल्क ५० आणि ६० रुपये असून ते चलो स्मार्ट कार्ड शिवाय देखील ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत कोणत्याही बसमार्गावरील बसवाहकाकडे उपलब्ध केले जाणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले.
बेस्टची सोयी, सुविधांसह चोख व्यवस्था -
- चैत्यभूमी, शिवाजीपार्क, दादर चौपाटी, राजगृह आंबेडकर कॉलेज, दादासाहेब फाळके रोड व मादाम कामा रोड आदी ठिकाणी अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे
- वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी ६२.५ के. व्हि ए क्षमतेचे जनरेटर्स
- दादर चौपाटी, महापौर निवास व ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी ६ किलो वॅट क्षमतेच्या सर्च लाईट्स विशेष मनो-यावर बसवले जाणार
- दिव्यांच्या देखभालीसाठी एरियल लिफ्ट व वॉकी टॉकीने सुसज्ज असलेली पक्षके तैनात
- वीज पुरवठ्यासाठी राखीव पक्षकाची नेमणूक