वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान नाही - राज्यपाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान नाही - राज्यपाल

Share This


मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आणि राज्यात राजकीय वातावरण बिघडले. यानंतर आता राज्यपालानी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की, "मी महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही करु शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान होत नाही." असे त्यांनी या पत्रात लिहले आहे.

राज्यपालानी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, "माझ्या भाषणामधील एक छोटा अंश काढून काहींनी त्याचे भांडवल केले. या भाषणात मी म्हणालो होतो की , मी शिकत असताना महात्मा गांधी, पंडित नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत. हे सर्व आदर्श आहेतच, पण सध्याच्या युवा पिढीतील तरुण वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतात. म्हणूनच मी म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात. म्हणजेच, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा यांनासुद्धा युवा पिढी आदर्श मानू शकते. याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही."

पुढे त्यांनी लिहिले आहे की, "यामध्ये कुठेही तुलना करणे हा विषयच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत. कोरोनाच्या काळामध्ये मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. माझ्याकडून कधी अनावधानाने चूक झालीच, तर तत्काळ खेद व्यक्त करणे किंवा क्षमायाचना करण्यास मी कधीच संकोच करत नाही."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages