मुंबई - वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. बीडीडी चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीस म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पायाभूत सुविधा प्रकल्प वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. डिग्गीकर यांनी प्रकल्पांच्या कामांबाबत सादरीकरण केले. वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग येथे एकूण १५९ बीडीडी चाळी आहेत. वरळी येथील १२१ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात ३४ चाळी आणि २५२० गाळ्यांचा पुनर्विकास होत आहे, तर नायगाव येथील ४२ पैकी पहिल्या टप्प्यात २३ चाळी आणि १८२४ गाळ्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. ना.म. जोशी मार्ग येथील ३२ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात १६ चाळी आणि १२८० गाळ्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात रहिवाशांना विविध सोयी मिळणार असून त्यामध्ये व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगिंग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, सिनिअर सिटीजन प्लाझा या सुविधांचा अंतर्भाव असणार आहे.
यावेळी पात्र निवासी झोपडीधारकांना सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २६९ चौरस फूटाऐवजी ३०० चौरस फूट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. चाळ परिसरातील पात्र निवासी झोपडीधारकांना संक्रमण शिबिराऐवजी मागणी केल्यास दरमहा भाडे देण्याच्या पर्यायास यावेळी मंजुरी देण्यात आली.
No comments:
Post a Comment