पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसणा-या बोगस एनएसजी कमांडोला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2023

पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसणा-या बोगस एनएसजी कमांडोला अटक


मुंबई - नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडोचे ओळखपत्र गळ्यात घालून पंतप्रधानाच्या ताफ्यात घुसण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका संशयिताला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. या संशयित व्यक्तीकडे पोलिसांना ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ या सुरक्षा यंत्रणेचे ओळखपत्र सापडले असून हे ओळखपत्र बोगस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Bogus NSG Commando Arrested)

पंतप्रधान यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रामेश्वर प्रसाद दयाशंकर मिश्रा (३५) असे अटक करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. तो नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर २, संकल्प चौक या ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

पंतप्रधान यांची सभा १९ जानेवारी रोजी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर होती. त्या ठिकाणी पोलिसांचे सुरक्षेचे कडे तयार करण्यात आले होते. हे सुरक्षेचे कडे तोडून एक संशयित व्यक्ती पंतप्रधान यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करत होता. बंदोबस्तावर असलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी या व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून संशय येताच त्याला हटकले असता त्याने एनएसजी कमांडो असल्याचे सांगत आपले ओळखपत्र दाखवले.

मात्र पोलिसांना त्याचे ओळखपत्र बनावट असल्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन बीकेसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रामेश्वर प्रसाद दयाशंकर मिश्रा असल्याचे सांगून तो एनएसजी कमांडो असून पंतप्रधान यांच्या सुरक्षेसाठी येथे आला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या विरोधात बनावट दस्तावेज बाळगणे व अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपासासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणेची मदत घेतली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad