मुंबई - भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे तसेच भांडुप संकुलातील जल वाहिन्यांची कामे केली जाणार आहे. या कामासाठी ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ते ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० पर्यंत मुंबईतील १२ विभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर दोन विभागात २५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे. (Water cut in Mumbai)
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी देखील अव्याहतपणे कार्यरत असते. मुंबईकरांना करण्यात येणारा दैनंदिन पाणीपुरवठा हा सुरळीतपणे व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे आणि पाणीपुरवठा प्रकल्प खात्याद्वारे पाणीपुरवठा विषयक सुधारणांची तसेच परिरक्षणाची विविध कामे महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी हाती घेतली जातात. याच कामांचा भाग म्हणून भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत.
सदर कामांच्या अनुषंगाने दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तर २ विभागातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना माळवदे यांनी सांगितले की, पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या ९ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. 'जी उत्तर' आणि 'जी दक्षिण' या २ विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात दि. ३० व ३१ जानेवारी २०२३ रोजी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी २०२३ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अधिक सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही कामे हाती घेतली जात आहेत. या कामांमुळे दि. २९ जानेवारी २०२३ तसेच दि. ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपरोक्त विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी कृपया पाणीपुरवठा खंडित असण्याच्या कालावधीत व पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याच्या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment