मुंबई - मुंबईतील अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेत लोक प्रतिनिधींच्या आदेशानुसार महानगरपालिकेचे आयुक्त नेमणूका करत असल्याचा गंभीर आरोपही राजा यांनी केला आहे. आपल्याकडे याबाबतचे पुरावे असल्याचेही ते म्हणाले. मराठी मुलांवर झालेल्या लाठीचार्जच्या प्रकाराबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत निषेध व्यक्त केला. (Appointments in Mumbai Fire Brigade on the recommendation of MLAs)
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. त्यामुळे आयुक्तांना या सगळ्या प्रकाराबाबत लेखी पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही, तर आम्ही न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील अनेक आमदारांच्या शिफारशीचे पत्र हे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे गेले आहे. त्या शिफारस पत्रानुसारच अग्निशमन दलातील भरती प्रक्रियेअंतर्गत नेमणुका करण्याचे प्रकार सुरू आहेत. आपल्याकडे या सगळ्या प्रकाराचा भक्कम पुरावा आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत जर पारदर्शकता नसेल तर ही भरती प्रक्रिया योग्य नसल्याची टीका त्यांनी केली आहे. अशा प्रकारच्या भरती प्रक्रियेबाबत काही तक्रारीही आल्याचे रवी राजा म्हणाले.
मुंबई अग्निशमन दलाच्या ९१० अग्निशामक पदाच्या भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार दाखल झाले होते. गेल्या महिन्यात १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत ही भरती प्रक्रिया पार पडली. त्यांमध्ये १६ हजार ५७१ उमेदवार अपात्र ठरले. तर २५ हजार ९६३ उमेदवार पात्र ठरले. पात्र उमेदवारांपैकी १४ हजार ५९६ जणांनी भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी पूर्ण केली. तर ११ उर्वरीत ११ हजार ३६७ जणांची चाचणी आगामी काळात केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment