Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले डॉक्टर


ठाणे - प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत असत. आजचे उच्च शिक्षण त्या विद्यापीठांच्या उंचीवर नेऊ शकतो का, याचा विचार करायला हवा, असे प्रतिपादन महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे व्यक्त केले.

नेरुळ येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमत ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती तथा अध्यक्ष डॉ. विजय पाटील, प्र कुलपती शिवानी पाटील, कुलगुरू वंदना मिश्रा चतुर्वेदी, आदी यावेळी उपस्थित होते. 

सामाजिक, वैद्यकीय सेवा व आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सेवेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच सामाजिक कार्यासाठी दर्डा यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट (डी. लिट) देण्यात आली. या कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री शिंदे यांचे वडील संभाजीराव शिंदे, पत्नी लता शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दर्डा यांना डी. लिट. पदवी मिळाल्याबद्दल राज्यपालांनी दोघांचे अभिनंदन केले. 

राज्यपाल बैस म्हणाले की, दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांसाठी खास दिवस असतो. पदवी घेताना तुमच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद दिसत आहे. आजपासून तुम्ही नव्या आयुष्यात पाऊल टाकाल आणि तुमचे भविष्य ठरवाल. तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही सुशिक्षित होऊन भविष्यातील जीवनाच्या वेगळ्या वाटेवर जाणार आहात. तुमच्या गुरूंसोबत माझेही आशीर्वादही तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहेत.

शिक्षणाच्या माध्यमातून प्रबुद्ध, सुसंस्कृत आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने 2003 मध्ये डी वाय पाटील विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. डॉ. पी. डी. पाटील आणि त्यांच्या समर्पित प्राध्यापकांच्या टीमने गेल्या वीस वर्षांत या संस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.  शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्नशील राहून, नॅकद्वारे ए प्लस प्लस मानांकन देऊन विद्यापीठाला उच्च शैक्षणिक जगतात सन्माननीय स्थान मिळविले आहे, असे बैस म्हणाले. डी. वाय. पाटील विद्यापीठाची सतत वाढत जाणारी प्रगती ही शिक्षणविश्वासाठी नवा इतिहास रचत आहे. विद्यापीठातील सर्व विद्याशाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे शिखर गाठण्याची संधी मिळत आहे, असेही बैस म्हणाले. 

बैस म्हणाले की, विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले मानाचे स्थान निर्माण केले आहे, ही आनंदाची बाब आहे. येथील विद्यार्थी जगातील कोणत्याही देशात जाऊन मानवाला निरोगी ठेवण्याचे काम करतील. आज बालरुग्ण आणि प्रौढ रूग्णांच्या पद्धतशीर थेरपीची नितांत गरज आहे, हे लक्षात घेऊन डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधील नवीन कॅथ लॅबमध्ये आधुनिक सुविधांसह वैद्यकीय - विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर काम करण्याची क्षमता निर्माण केली आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. विद्यापीठात शिकण्याबरोबरच मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सुरू असलेले उपक्रमही उल्लेखनिय आहेत. क्रीडा विश्वात जागतिक स्तरावर भूमिका बजावण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे, असेही बैस म्हणाले.

पदवी राज्यातील सर्वसामान्य जनतेला व विद्यार्थ्यांना अर्पण - मुख्यमंत्री
डी. लिट. पदवीने सन्मान झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेला डिलिट सन्मान मी राज्यातील जनतेला, गरीब, हुशार आणि संघर्ष करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्पण करतो. समाजाने, या राज्याने मला प्रेम दिले म्हणून मी आज हा सन्मान स्वीकारत आहे. कौटुंबिक जबाबदारीमुळे मला शिक्षण घेता आले नाही, परंतु नुकतेच मी माझे बीए शिक्षण पूर्ण केले आहे. यापुढील काळातही आणखी अनेक गोष्टी करायच्या आहेत. इतके वर्ष समाजात काम करताना मला जगाच्या विद्यापीठाने खूप काही शिकवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे विनम्रता. विनम्रता हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये किती चढउतार आले आणि प्रत्येक माणसाने विनम्र असलं पाहिजे. 

लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी मिळालेल्या पदाचा, जबाबदारीचा वापर सर्वसामान्यांच्या अडचणीच्या, संकटाच्या काळात मदतीसाठी करायचे असते, ही शिकवण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांनी दिली. सर्व सामान्य शाखाप्रमुख, नगरसेवक, मुख्यमंत्री जरी झालो असलो तरी सुद्धा आजही मी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या सरकारने गेल्या सात आठ महिन्यात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. हे सरकार आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी, या समाजातल्या प्रत्येक घटकासाठी बांधील आहे. राज्य शासन शिक्षणाच्याबाबतीत अतिशय आमूलाग्र बदल करत आहे. शिक्षणाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे,  महापालिका, जिल्हा परिषदेच्या तसेच शासकीय आश्रम शाळाचा दर्जा वाढवला पाहिजे यासाठी देखील प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, समर्पण भाव व कष्ट करण्याची तयारी हवी. हे असेल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल, असेही मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

डी. वाय. पाटील हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या शिक्षण क्षेत्रातले दीपस्तंभ आहेत. शिक्षणाला खऱ्या अर्थाने एका ठराविक साच्यातून बाहेर आणण्याचं काम त्यांनी केले. वीस-बावीस वर्षांपूर्वी डी. वाय. पाटील विद्यापीठाची छोटीशी सुरुवात नेरुळमध्ये झाली. या विद्यापीठामुळे या भागाचा चेहरा मोहरा बदलला असून एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. हे विद्यापीठ जीवनात यशस्वी कसं व्हायचं याचा मंत्र देत आहे. डी वाय पाटील या संस्थेने खूप हजारो लोकांना मदत केली, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

डी वाय पाटील विद्यापीठाने यापूर्वी अनेक महान व्यक्तींना मानद डॉक्टरेटने सन्मानित केले आहे. त्यांच्या यादीत आज माझ्यासारखा कार्यकर्ता सामील झाला, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी  व्यक्त केल्या.

यावेळी विजय दर्डा म्हणाले की, मला मिळालेला डिलीट पदवीचा हा सन्मान प्रतिष्ठतेचा व प्रेरणादायी आहे. समाजासाठी काम करण्याची प्रेरणा बाबूजींमुळे मिळाली. त्यामुळे या महत्वाच्या प्रसंगी त्यांची आठवण येत आहे. समाजाच्या विकासासाठी काम करण्याची तसेच समाजाला न्याय व समतेचा आधार मिळवून देण्यासाठी प्रेरणा देणारा हा सन्मान आहे.  

यावेळी कुलपती डॉ. पाटील यांनी स्वागत करून प्रास्तविक विद्यापीठाची माहिती दिली. उपकुलपती श्रीमती शिवानी पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल वाचन केले तर कुलगुरू चतुर्वेदी यांनी दीक्षांत समारंभाचे संचालन केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom