मुंबईत ३१ मार्चपासून ३० दिवस १५ टक्के पाणीकपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 March 2023

मुंबईत ३१ मार्चपासून ३० दिवस १५ टक्के पाणीकपात


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱया जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे. या कारणाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱया पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून पुढील ३० दिवस १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहराला पुरवल्या जाणाऱया पाणीपुरवठ्याला देखील ही कपात लागू राहील.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई शहर व उपनगराच्‍या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्‍के पाणीपुरवठा हा भांडुप संकूल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्‍के पाणीपुरवठा मुख्‍यत्‍वे ५,५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या १५ किलोमीटर लांबीच्‍या जलबोगद्याद्वारे होतो. या जल बोगद्यास ठाणे येथे कूप‍नलिकेच्‍या खोदकामामुळे हानी पोहचल्याचे निदर्शनास आले आहे. या हानीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पर्यायाने, सदर पाणी गळती दुरुस्‍तीसाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करणे व दरम्‍यानच्‍या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचविणे आवश्‍यक आहे. पर्यायी पाणीपुरवठा व्‍यवस्‍था कार्यान्वित करण्‍यासाठी काही अत्‍यावश्‍यक बदल करणे गरजेचे झाले आहेत.

या कारणाने, वहन व्‍यवस्‍थेत बदल सुरु असताना व जलबोगदा दुरुस्‍तीच्या काळात मुंबई शहर व उपनगराचा पाणीपुरवठा बाधित होणे अटळ आहे. पर्यायी व्‍यवस्‍थेला देखील काही तांत्रिक कारणास्‍तव पूर्ण क्षमतेने वापरासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे सध्‍या भांडुप संकुल येथे प्रक्रिया होत असलेल्‍या प्रमाणाइतके पाणी पोहचविणे व प्रक्रिया करणे शक्‍य होणार नाही. 

या सर्व बाबी लक्षात घेता, बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी व बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे शहरास होणाऱया प्रक्रियायुक्‍त पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्‍के कपात करण्‍यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुंबई शहर व उपनगर परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad