पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे प्रशिक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

२१ एप्रिल २०२३

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे प्रशिक्षण


मुंबई - विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मुंबई महापालिका शाळांत अभिनव उपक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा आणि मल्लखांब क्षेत्रात त्यांना रुची निर्माण व्हावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे (रोप मल्लखांब) प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. धारावीतील दोन शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती  शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी यांनी दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. धारावी भागातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला १८ ते ३० एप्रिल दरम्यान दोरीवरील मल्लखांब शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रीशिवछत्रपती पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार तसेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ क्रीडापटू आणि प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी क्रीडा उपविभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, प्रशासकीय अधिकारी (शाळा) स्नेहलता डुमरे, क्रीडा पर्यवेक्षक दत्तू लवटे, कनिष्ठ पर्यवेक्षक कुनील सोनवणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील क्रीडा उपविभागाकडून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दादर येथील समर्थ व्यायाम मंदिराचे सहकार्य लाभले आहे. धारावी भागातील टीसी मनपा शाळा आणि संत कंकय्या मार्ग या दोन्ही शाळांमध्ये दोरीवरील मल्लखांब प्रशिक्षणाचा पथदर्शी प्रकल्प राबवला जात असून त्या अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी दोन्ही शाळांमधील इंग्रजी, हिंदी, उर्दू, मराठी तसेच तमिळ माध्यमाच्या तिसरी आणि चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांतून ८० विद्यार्थ्यांची पुढील प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. दोरीवरील मल्लखांबसाठी लागणारे सर्व साहित्य  महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती क्रीडा उपविभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages