Mumbai News - बायोगॅस प्रकल्पामुळे मुंबई कचरामुक्त होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 June 2023

Mumbai News - बायोगॅस प्रकल्पामुळे मुंबई कचरामुक्त होणार


मुंबई - मुंबईतील कचऱ्याची समस्या मार्गी लागावी, महानगरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्यात कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. कचऱ्यापासून तयार होणारा हा बायोगॅस मुंबईला प्रदूषणापासून मुक्त ठेवणार, असा आशावाद राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. महानगरपालिका आणि महानगर गॅसने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे लवकरच मुंबईतील हजारो टन कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे. यासोबत मुंबईकरांना पर्यावरणपूरक बायोगॅसही वापरासाठी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महानगर गॅस कंपनी दरम्यान बायोगॅस संयंत्र प्रकल्प स्थापन करण्यासाठी (दिनांक ८ जून २०२३) सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, महानगर गॅसचे अध्यक्ष महेश अय्यर, व्यवस्थापक आशू सिंघल, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री केसरकर म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. स्वच्छ आणि सुंदर मुंबईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना मुंबईकरांनीही जोड द्यायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे. गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनाही सामावून घ्या. जणेकरून शाळेतच मुलांमध्ये जनजागृती केली तर हा विषय घरोघरी पोहोचेल, असे त्यांनी नमूद केले.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने देशात सर्वत्र पर्यावरण संवर्धन उपक्रमांवर भर दिला जात आहे. आधुनिक, हरित आणि पर्यावरण पूरक इंधनाचे पर्याय स्वीकारून पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी केले जात आहे. महाराष्ट्र शासन देखील राज्यात सौर ऊर्जा, हरित ऊर्जा यावर जोर देत आहे. या शृंखलेतील हा बायोगॅसचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर आपण भविष्यातील आधुनिक मुंबई पाहणार आहोत. कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे, तसेच प्रदूषण कमी होवून नागरी आयुर्मान देखील सुधारणार आहे. त्यामुळे मुंबईची नव्या दिशेने वाटचाल होईल, असे त्यांनी नमूद केले.

कार्बन न्यूट्रलसाठीचे उद्दिष्ट - आयुक्त 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून कचऱ्याचे विलगीकरण आणि पुनर्वापराची प्रक्रिया नियमितपणे करण्यात येते. मुंबईत सन २०५० पर्यंत कार्बन न्यूट्रलसाठीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट इतर शहरांच्या तुलनेत वीस वर्ष आधीचे ठेवण्यात आले आहे, असेही महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले. तसेच मुंबईत तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी आगामी कालावधीत आणखी भूखंड उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना मालमत्ता कराममध्ये ५  टक्के ते १० टक्के इतकी प्रोत्साहनपर सवलतही देत आहोत, असेही त्यांनी सांगितले.      

शहर आणि पर्यावरणासाठी चक्राकार अर्थव्यवस्था निर्माण होणार -
अद्ययावत तंत्रज्ञानामुळे कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीची पर्यावरणपूरक अशी उपाययोजना या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीमुळे सार्वजनिक, खासगी भागीदारीतून शहरासाठी एक शाश्वत पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्राचाही वेळोवेळी पाठिंबा लाभलेला असून यशस्वी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका प्रयत्न करणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. प्रकल्पाच्या माध्यमातून चक्राकार अर्थव्यवस्था निर्माण होऊन पर्यावरणासाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. 

रोजगार निर्मिती होणार - 
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या भूखंडावर लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे, हवामान बदलाचे परिणाम कमी करणे हा उद्देश ठेवून हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती देखील होणार आहे.

असा आहे प्रकल्प -
मुंबई महानगरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल येथील वाया गेलेले अन्न आणि मोठ्या भाजी मंडईतील वाया गेलेला भाजीपाला संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी दररोज लागणारा जैविक कचरा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून खास वाहनातून पुरविला जाणार आहे. कचऱ्याचे संकलन, पृथक्करण आणि वितरण अशी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

तीन टप्प्यांत सुरू होणार प्रकल्पाचे काम -
बायोगॅस प्रकल्प प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम सुरू राहणार आहे. त्यात जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत उत्पादन संयंत्र आणि हरित इंधन उत्पादन संयंत्र या टप्प्यांचा समावेश असेल. या प्रकल्पाद्वारे उत्पादित केलेला जैविक वायू बृहन्मुंबईच्या हद्दीत वापरला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जैविक कचरा देण्याचे नियोजन सुरू केल्याची माहिती चंदा जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad