Mumbai News - दादरच्या शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूलला ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ पुरस्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2023

Mumbai News - दादरच्या शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूलला ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ पुरस्कार


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेची दादर येथील शिंदेवाडी एम. पी. एस. या शाळेची ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ स्पर्धेत अव्वल दहा शाळांमध्ये निवड झाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या उपस्थितीने शाळांचा परिसर गजबजलेला असताना ही निवड जाहीर करण्यात आल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ ही स्पर्धा ब्रिटनमधील 'टी ४' एज्युकेशन संस्था भरवत असते. या स्पर्धेत जगभरातील शाळा सहभागी होतात. त्यामुळे या स्पर्धेची व्याप्ती मोठी असते. याबाबत 'टी ४' एज्युकेशन संस्थेने आज (दिनांक १५ जून 2023) सकाळी ११ वाजता जगभरातील सर्वोत्कृष्ट शाळांची निवड जाहीर केली. या शाळांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दादर येथील शिंदेवाडी एम. पी. एस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची 'वर्ल्ड बेस्ट स्कूल' म्हणून भारतातील अव्वल दहा शाळांमध्ये निवड झाली आहे. आकांक्षा फाउंडेशनने ही शाळा दत्तक घेतली असून, फाउंडेशनकडून या शाळेला संपूर्ण शैक्षणिक आणि इतर उपक्रमांमध्ये सहकार्य केले जाते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग नवनवीन उपक्रम राबवित आहे. या प्रयत्नांतून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दादर येथील शाळेची निवड झाली आहे. आता सप्टेंबर महिन्यात देखील या दहा शाळांमधून तीन अव्वल शाळा निवडण्यात येणार आहेत.

विविध उपक्रमांच्या पाठीशी राहणारी टी ४ संस्था - 
जगभरातील शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेवून असे उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण संस्थांचा गौरव करण्यासाठी ब्रिटनमधील ‘टी ४’ ही संस्था काम करते. यंदा या संस्थेने पर्यावरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, लोकसमूह आणि सुदृढ आरोग्यासाठी प्रोत्साहन अशा क्षेञात काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची निवड केली होती. त्यानुसार दादर येथील शिंदेवाडी एम. पी. एस. या शाळेची सुदृढ आरोग्यासाठी प्रोत्साहन या क्षेञात राबविलेल्या उपक्रमामुळे संस्थेकडून निवड करण्यात आली.

शिक्षणासह मुलांच्या आरोग्यासाठी झटणारी शाळा - 
कोविड टाळेबंदीनंतर शाळा सुरू झाल्यावर शिंदेवाडी एम. पी. एस. शाळा प्रशासनाला काही विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत तक्रारी जाणवल्या. शाळेतील २५६ मुलांचे वजन कमी झाल्याचे निदर्शनास आले. या मुलांचे वय, उंची आणि वजनाच्या प्रमाणात तफावत दिसून आली. तर या २५६ पैकी १०३ मुलांचे शारीरिक वजन खूपच कमी होते. या मुलांच्या पालकांचे शाळेने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) या संस्थेकडून प्रबोधन केले. त्यांच्या आहाराविषयी पालकांमध्ये जनजागृती केली. तसेच वजन कमी असलेल्या मुलांची आरोग्य पञिका (हेल्थकार्ड) बनवून त्यावर दैनंदिन नोंदी घेण्यात आल्या. दर तीन महिन्यात या मुलांची आरोग्य तपासणी शाळेकडून करण्यात आली. मध्यान्न भोजनासह मुलांच्या आहारात फळांचाही समावेश करण्यात आला. मुलांच्या आरोग्यासाठी शाळेने राबविलेल्या या उपक्रमाची ब्रिटनमधील टी ४ संस्थेने दखल घेत शाळेची निवड केली असल्याचे मुख्याध्यापिका साक्षी भाटिया यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad