५ वर्षांत ११५ वाघांचा मृत्यू, २४ वाघांची शिकार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 July 2023

५ वर्षांत ११५ वाघांचा मृत्यू, २४ वाघांची शिकार


मुंबई - जगभरात २९ जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. नागपूर शहरासह विदर्भाच्या परिघात मोठ्या प्रमाणात व्याघ्र प्रकल्प व अभयारण्ये आहेत. त्यामुळेच नागपूर शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.

वाघांची संख्या आणि त्यांचा अधिवास वाढावा यासाठी शासनदरबारी अनेक उपाययोजनांचा दावा केला जात असला तरी त्यात समाधानकारक यश आल्याचे म्हणता येणार नाही. कारण गेल्या ५ वर्षांतील वाघांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या काळात राज्यात तब्बल २४ वाघांची शिकार झाली असून ११५ वाघांचा मृत्यू झाला आहे.

२४ वाघांची झाली शिकार
महाराष्ट्रात गेल्या २०१८ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल ११५ वाघांचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे याच कालावधीत तब्बल २४ वाघांची शिकार करण्यात आली तर अपघात आणि विद्युत प्रवाहामुळेही २२ वाघांचा बळी गेला.

शिका-यांवर नियंत्रण आणण्यात अपयश
गेल्या पाच वर्षांत मृत्यू झालेल्या ११५ वाघांपैकी सर्वाधिक ६७ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा दावा विभागाने केला आहे. मात्र यात २४ वाघांची शिकार झाल्याची माहिती विभागाने दिली आहे, जी धक्कादायक आहे, कारण शिका-यांवर नियंत्रण मिळविण्यात वनविभागाला हवे तसे यश मिळाले नाही, हेच दिसून येत आहे.

जंगलातून जाणारे महामार्ग धोकादायक
शिवाय जंगलातून जाणारे महामार्गही वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत असून १२ वाघ अपघातांचे बळी ठरले आहेत. शेतात लावण्यात येणारे विद्युत प्रवाह हे सुद्धा प्राण्यांच्या जिवावर उठले असून, १० वाघ विद्युत प्रवाहाचे बळी ठरले आहेत. या वर्षात देशातही सर्वाधिक १२७ वाघांच्या मृत्यूची नोंद असून कोरोना महामारीनंतर शिकारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वन विभाग आणि प्रशासनाने यावर वेळीच लक्ष द्यावे, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad