महायुतीचे २०० पेक्षा जास्त आमदार व ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून येणार - उदय सामंत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2023

महायुतीचे २०० पेक्षा जास्त आमदार व ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून येणार - उदय सामंत


मुंबई - कुणी कितीही दौरे केले व कितीही आदळाआपट केली तरी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महायुतीचे (Mahayuti) आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त खासदार (MP) व विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक आमदार (MLA) निवडून येतील, असा ठोस विश्वास शिवसेनेचे (Shivsena) उपनेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

आमच्यावर, आमच्या नेतृत्वावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम विरोधकांनी सुरु ठेवला आहे, स्वतःकडे असलेले निवडक आमदार व निवडक कार्यकर्ते  टिकवण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरु आहे. त्यांची ही अस्तित्वाची लढाई सुरु आहे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो व अशा भाषणांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असे ते म्हणाले.  आम्ही जनतेशी व जनतेच्या विकासाशी बांधील आहोत, तेच आमचे उद्दिष्ट आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल, असे ते म्हणाले. राज्यातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली होतील, याचा पुनरुच्चार सामंत यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार दमदारपणे वेगाने काम करत आहे. त्यामुळे आम्ही विरोधकांच्या कोणत्याही आरोपांना महत्त्व न देता जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत.  आम्हाला शिवीगाळ करुन कुणाला त्यांची सत्ता येईल, असे वाटत असेल तर ती त्यांची दिवास्वप्ने आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

खातेवाटप व मंत्रिमंडळाचा विस्तार समतोल पध्दतीने केला जाईल, कुणी नाराज होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ते एकत्रितपणे याबाबतचा निर्णय घेतील, असे सामंत म्हणाले.

सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने त्यांचा तिळपापड होत आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम काही लोकांना झोंबला आहे. कोट्यवधी जणांना या कार्यक्रमाचा लाभ होत आहे. ही संकल्पना पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवली आहे. त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिंदेंचे कौतुक झाल्याने काहीजणांच्या पोटात दुखत आहे. सर्वसामान्य घरातील मुख्यमंत्री होऊ नये असा विचार असणारेच टीका करत आहेत, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला. रुग्णालयात असताना बैठका झाल्या असे सांगणाऱ्यांना रुग्णालयात नेमक्या किती बैठका झाल्या हे मला सांगावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. तात्विक विरोध समजू शकतो मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणे विरोध करणे चुकीचे आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला अधिक निधी मिळत होता, त्यावर आमदारांनी आवाज उठवला होता मात्र तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या तक्रारीकडे दु्र्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

पालकमंत्री पदाचा निर्णय देखील तिन्ही नेते एकत्रितपणे घेतील. महामंडळे कोणत्या पक्षाला किती मिळणार याचा निर्णय आठ दहा दिवसांत घेतला जाईल. विविध समित्यांबाबतचा निर्णय समन्वय समितीमध्ये पुढील आठवड्यात होईल, असे त्यांनी जाहीर केले.  पुलोद मध्ये झाला होता तसाच प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केला, या बाबी राजकारणात १९७८ पासून चालत आलेल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत आलेल्यांवर टीका करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. कलंक बाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती होती. विरोधकांकडून सध्या केवळ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केली जात आहे. पुढे अजित पवारांची बदनामी केली जाईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. वादग्रस्त विधाने टाळण्याचा सल्ला त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad