मुंबई - बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा सत्तेवर लाथ मारली, मात्र दुसरीकडे तुम्ही केवळ सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. बाळासाहेबांनी ज्यांना कायम दूर ठेवले त्यांना सोबत घेतले, ज्या मतदारांनी निवडून दिले त्या मतदारांना धोका दिला व बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही महाकलंक लावला अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर केली. ठाण्यात शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
२०१७ च्या मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापालिकेची सत्ता भाजप घेऊ शकत होती मात्र त्यांनी उदारपणे सत्तेचा दावा सोडला व ती सत्ता तुम्हाला दिली. त्याबदल्यात तुम्ही भाजपला काय दिले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा तुमचा कृतघ्नपणा आहे, वरुन तुम्ही देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हणता, असे शिंदे म्हणाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला बहुमत देणाऱ्या मतदारांसोबत दगाबाजी केली आणि वर तुम्ही दुसऱ्यांना गद्दार म्हणता. मात्र राज्यातील जनता सुज्ञ आहे, जनता सर्व समजून उमजून आहे, जनतेच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, याचे समाधान आहे. आमच्याकडे ५० आमदार मोदी, शहा, नड्डा यांनी मुख्यमंत्री पद दिले. देवेंद्र फडणवीसांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवत मला मुख्यमंत्री करण्यास साथ दिली, याला मनाचा मोठेपणा म्हणतात. सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले. त्यामुळे जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आमच्यावर बाळासाहेबांचे व धर्मवीर आनंद दिघेंचे संस्कार आहेत, त्यामुळे आम्ही मर्यादा सोडून बोलत नाही. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असे समजू नका, आमच्याकडे सगळे आहे. बोलायला लागलो तर पळता भुई कमी होईल, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत ठाणे दिघे साहेबांचेच राहणार, ठाण्यावर बाळासाहेबांनी भरपूर प्रेम केले, ठाण्याने देखील शिवसेनेला भरभरुन दिले आहे. शिवसेना व ठाणे हे नाते कुणीच कधीच दूर करु शकत नाही, असा ठाण्याचा इतिहास आहे. धर्मवीर दिघे असतानाही अनेक चढउतार पाहिले मात्र गॉडफादर पाठीशी असल्याने आपल्याला काहीही चिंता नव्हती. दिघेंच्या पश्चात त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. धर्मवीर दिघेंनी दाखवलेला मार्ग व बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे मार्गक्रमण करत आहोत. ठाणेकरांना बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आहे.
सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवणारे, त्यांना न्याय देण्याचे अनेक निर्णय, देवेंद्र फडणवीस व मी पहिल्या कॅबिनेटपासून घेतले आहेत. महाविकास आघाडीमध्ये काय होते त्यामध्ये मला पडायचे नाही. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्हाला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये घेता आला नाही. ३७० कलम हटवणे राम मंदिर बनवणे बाळासाहेबांचे स्वप्न होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी ते पूर्ण केले. त्यावेळी जल्लोष देखील करता आले नाही हे दुर्दैव आहे. अडीच वर्षात केवळ राजकारण करण्यात दंग होते. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होता, सत्ता येत जात असते, सत्ता कायम नसते, सत्तेची मस्ती डोक्यात गेली तर लोक बरोबर लक्षात ठेवतात. खोके घेणाऱ्यांनी खोक्याची भाषा करु नये, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.
अडीच वर्षात घरी बसणाऱ्यांना शासन आपल्या दारी कसे कळणार, त्यासाठी बाहेर निघावे लागेल, सरकारच्या विविध योजनांचा लाभ जनतेला एकाच ठिकाणी दिला जात आहे. आम्ही तुमच्यासारख्या नोटा मोजण्याचे मशीन घेत नाही, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही याचा अनुभव तुम्हाला आहे. आम्ही कधी घेण्याची वृत्ती दाखवली नाही. बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना तुम्ही काय दिले, त्यांचा अपमान केला. घरादारावर तुळशीपत्र ठेवून शिवसैनिक झटले. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती, हेच आमचे ऐश्वर्य आहे. तुमच्या संपत्तीचा मोह आम्हाला नाही असे शिंदे म्हणाले.
राजकारणात काही बेरजेची गणिते असतात, त्यामुळे राज्यात विकासाला साथ देण्यासाठी अजित पवार सोबत आले. एकनाथ शिंदेसोबत झालेली युती भावनिक, तात्विक, विचाराची आहे, फडणवीस म्हणाले आहेत. तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही. २०० पेक्षा जास्त आमदार आमच्या पाठीशी आहेत. आम्ही धाडसी निर्णय घेत आहोत. आम्ही घेतलेला निर्णय सर्वसामान्य जनतेच्या हिताचा आहे. महिला, विद्यार्थी, शेतकरी, रुग्णांसाठी विविध निर्णय घेतले. मुख्यमंत्री निधी दोन वर्षात २ कोटी देखील दिले नव्हते, आम्ही एका वर्षात ९० कोटी पेक्षा जास्त निधी दिला. मी जमिनीवरील कार्यकर्ता आहे. मला सामान्य नागरिकांना काय समस्या भेडसावतात त्याची जाणिव आहे. आमच्या सरकारने महात्मा ज्योतिबा फुले योजनेची मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख केली व राज्यातील सर्व बारा कोटी सर्व जनतेला त्यासाठी पात्र ठरवले आहे.
बाळासाहेबांच्या व धर्मवीर दिघेंच्या सानिध्यात काम करत मोठे झालो आहोत, सरकारी काम आणि सहा महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकला आहे, लोकाभिमुख कामाला आम्ही प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमचे उद्दिष्ट आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे, आम्ही तुमच्यासाठी कार्यरत आहोत, तुमचे समाधान महत्त्वाचे आहे.
पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जणू कर्फ्यु होता, आता वर्षाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडे आहेत, वर्षा आपले सर्वांचे आहे, सर्वसामान्यांचे दुःख, वेदना, अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत आमुलाग्र बदल घडवत आहोत.
मुंबईतील सर्व रस्ते पुढील दोन अडीच वर्षात खड्डेमुक्त करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कोविड काळातील गैरव्यवहारांची चौकशी सुरु झाली व इतकी वर्षे महापालिकेची सत्ता भोगणारे मोर्चे काढायला लागले, या घोटाळ्यांमधील सत्य समोर यायला हवे. आम्ही मुंबईच्या साडे चारशे किमी रस्त्याच्या क्रॉंकिटीकरणाचे काम सुरु केले आहे. हा निर्णय १० वर्षांपूर्वी घेतला असता तर साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते, अपघात, त्यातील जखमी, मृत्यू वाचले असते. कोविड मृतदेह नेण्यासाठी ठाण्यात ३२५ रुपयांची मिळणारी बॉडीबॅग मुंबईत ६७०० रुपये खर्चून घेण्यात आली. मृतदेह नेणाऱ्या बॉडीबॅगेत पैसे खाल्ले गेले. ऑक्सिजन प्लॅंट सदोष असल्याने ब्लॅक फंगसला रुग्णांना तोंड द्यावे लागले. गेली १५-२० वर्षे मुंबई पालिकेच्या पैशावर दरोडे टाकला तीच मंडळी आता चोरीची, भ्रष्ट्राचाराची भाषा करत आहेत, यापेक्षा काय दुर्दैव असेल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. कार्यकर्त्यांनी सरकारचे काम जनतेपर्यंत पोचवण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मी मुख्यमंत्री असलो तरी राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला जणू तोच मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत आहे, हा पूर्वीच्या सरकार व आताच्या सरकारमधील फरक आहे. जनता हे माझे टॉनिक आहे. धर्मवीरांनी ठाण्यात, बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन राज्यात शाखांचे जाळे निर्माण केले. शाखांच्या माध्यमातून समस्या सोडवण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मी मंत्रालयात गेल्यावर सुमारे हजार लोकांना भेटतो, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, हेच शाखांच्या माध्यमातून अपेक्षेत आहे, असे ते म्हणाले. तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम सांभाळायचे आहे, ठाणे तुम्ही सांभाळायचे आहे. काही लोकांना पट्टे होते, ते पटापट निघाले, सरपे कफन बांधके जो घुमता है उसे पट्टे से क्या डर है या शायरीतून त्यांनी आपले विचार मांडले. ठाणे आपला बालेकिल्ला आहे. ठाणे बाळासाहेबांचे व धर्मवीरांचे आहे, ठाणे खणखणीत हिंदुत्वाचे नाणे आहे, तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे तुम्ही चिंता करु नका, तुमची चिंता करण्याची जबाबदारी माझी आहे, असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला. शिवसेना भाजपची आपली २५ वर्षांची युती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना भारताची अर्थव्यवस्था कायम ठेवणे, टिकवणे, दहाव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आणणे हे महत्त्वाचे काम करत आहेत. देशाला महासत्ता बनवण्याचे काम मोदी करत आहेत, त्यांचे पाठबळ आपल्याला आहे, असे ते म्हणाले.
सरकार म्हणून आम्ही महिला बचत गटांना पाठबळ देण्याचे काम करणार आहोत, ब्रॅंडिंग, विक्री, सर्वांसाठी मदत करणार आहोत. महिलांचे सशक्तीकरण करणार आहोत. पुरवणी बजेटमध्ये आम्ही या सर्व कामांसाठी तरतूद केली आहे. महिला बचत गटांची व्याप्ती वाढवणार असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी पंचामृत बजेटच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या धडाकेबाज विकासकामांमुळे विरोधक धास्तावले आहेत, त्यांच्या पायाखालील वाळू घसरली आहे, एका वर्षात आम्ही एवढे काम केले त्यामुळे पुढील काळात विरोधकांसाठी भयानक व सर्वसामान्यांसाठी सर्वव्यापी असा विकास करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.
देशात प्रथम क्रमांकाच्या पायाभूत सुविधा राज्यात होत आहेत, मागील सरकारमध्ये केवळ अहंकार, इगोमुळे मेट्रो कारशेडला विरोध करण्यात आला, काम थांबवण्यात आले. विरोधामुळे १० हजार कोटी रुपये खर्च वाढला असता. खरे पाहता सत्तेत असताना अहंकार बाजूला ठेवून जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे असते तोच खरा राज्यकर्ता असतो. स्वार्थाला पारिवारीक स्वरुप येते त्यावेळी चांगले काम करणाऱ्याला त्रास होतो , राजकारणात पक्ष मोठा करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोठे करण्याची गरज असते, पक्षवाढीसाठी अनेकदा तत्कालिन नेतृत्वाशी बोलून झाले मात्र ते झाले नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये राज्याच्या विकासासाठी दिले, अडीच वर्षात काहीच मागितले नव्हते, अनेक योजनांचे पैसे पडून राहिले होते, आता केंद्राचा एकही पैसा परत जाता कामा नये याची पूर्ण काळजी सरकार म्हणून आपण करत आहोत. शेतकऱ्यांसाठी लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली येईल, त्यासाठी योजना राबवल्या जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, विचारांप्रमाणेच विकास देखील महत्त्वाचा आहे. सरकारवर विश्वास असल्याने रोज अनेक जण जोडले जात आहेत. ये कारवा बढनेवाला है रोक सके तो रोको हा शेर त्यांनी ऐकवला. पूर्वी काश्मिरमध्ये तिरंगा ध्वज फडकावला जात नव्हता, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे दिमाखात तिरंगा फडकावला जातो.
सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींना हटवण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्र आले तरी पंतप्रधानपदासाठी एकही नाव सुचवू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणूक आपण महायुती म्हणून लढवणार आहोत शिवसेना भाजप व राष्ट्रवादी ही ताकद आहे, मोदींना पुन्हा देशाचे पंतप्रधान बनवायचे आहे. देशाला जगात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी मोदीच हवेत हे देशातील जनतेने मनापासून ठरवले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ पेक्षा जास्त खासदार जिंकू व विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त आमदार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे तुम्हाला काही होऊ देणार नाही, तुम्ही कोणतीही चिंता करु नका, अशा शब्द त्यांनी शिवसैनिकांना दिला. ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व तुम्हाला एकनाथ शिंदे बनून करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment