साथरोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा - आरोग्य मंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 August 2023

साथरोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा - आरोग्य मंत्री


मुंबई - पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्साथरोगाच्याय आणि साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या साथरोग नियंत्रण बैठकीत दिले.
            
या बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, आरोग्य विभागाचे संचालक नितीन अंबावडेकर उपस्थित होते, तर राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.   राज्यातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुण्या आदी आजारांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. जास्त रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढीची कारणे व उपाययोजनांवर चर्चा झाली.
            
आरोग्य मंत्री सावंत पुढे म्हणाले की, साथरोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी राज्यस्तरीय वॉर रूमसह ज्या भागात एखाद्या साथरोगाचा उद्रेक झाला किंवा साथरोगांचे मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळत आहेत, अशा भागात साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी एक वॉर रूम तयार करावी. ही वॉर रूम राज्यस्तरीय वॉर रुम सोबत संलग्न असावी. वॉर रुमला साथरोग रुग्णांबाबत, फैलावाबाबत 24 तासांत माहिती द्यावी. जेणेकरून उपाययोजना करणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे घरोघरी सर्वेक्षण करून डासांची उत्पत्ती स्थाने शोधावी. त्यांना नष्ट करून किटकजन्य साथरोग आटोक्यात आणावा. सर्वेक्षणादरम्यान कुटुंबाला प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरुकही करावे.
            
साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक औषधांचा पुरवठा नियमितरित्या करण्याच्या सूचना करीत सावंत म्हणाले की, औषधांचा पुरवठा कुठेही बाधित होता कामा नये. आवश्यक औषधांचा साठा तपासून घ्यावा. त्यानुसार नियोजन करावे. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकांमार्फत शालेय मुलांची तपासणी करावी. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मलेरिया रूग्णसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये उपाययोजना कराव्यात. धूर फवारणी नियमित करावी. बांधकामांमुळे पाणी साचून किटकजन्य आजारांमधील वाढ लक्षात घेता, मुंबईत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने बांधकाम परवानगी देणाऱ्या विभागाची मदत घेवून पाणी न साचण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही मंत्री सावंत यांनी सांगितले. 
            
अपर मुख्य सचिव म्हैसकर यांनी साथरोगांच्याबाबत जनजागृतीवर भर देवून नागरिकांना याबाबत शिक्षित करण्याच्या सूचना दिल्या. आयुक्त धीरजकुमार म्हणाले की, पाणी नमुने तपासणी महत्वाचे आहे. दूषित पाणी नमुना आल्यास त्या ठिकाणी आवश्यक कारवाई करावी. रक्त नमुन्यांचे संकलन वाढवावे. मलेरीया, डेंग्यू व चिकुनगुण्या रूग्णांची तपासणी वाढवावी. अंबावडेकर यांनी बैठकीत साथरोगांच्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad