महापालिका रुग्णालयांमध्ये सुरु होणार 'रुग्ण मित्र’ मदतकक्ष - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2023

महापालिका रुग्णालयांमध्ये सुरु होणार 'रुग्ण मित्र’ मदतकक्ष


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये (Bmc Hospital) येणारे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या माहिती व मदत पुरवण्यासाठी 'रुग्ण मित्र’ (Rugna Mitra helpdesk) मदत कक्ष अर्थात हेल्प डेस्क सुरु करण्यात येणार आहे. राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई (Mumbai) उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सुचनेनुसार सदर हेल्पडेस्क कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये मिळून दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण, त्यांचे नातेवाईक येतात. वैद्यकीय सेवा-सुविधा, विविध विभाग तसेच इतरही पूरक माहिती एकाच ठिकाणी मिळाली तर रुग्णांना आणि नातेवाईकांना पर्यायाने रुग्णालय प्रशासनाला देखील ते सोयीचे होईल, या विचारातून मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 'रुग्ण मित्र’ मदत कक्ष अर्थात हेल्प डेस्क सुरु करण्याची सूचना महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी या कार्यवाहीला वेग दिला आहे. लवकरच ही 'रुग्ण मित्र’ हेल्प डेस्क सेवा कार्यान्वित होईल.

यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयांचे प्रवेशद्वार किंवा नोंदणी कक्ष या ठिकाणी सजावटीचे केबिन तयार करण्यात येईल. त्याठिकाणी रुग्णांची मदत करण्याच्या दृष्टीने कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. प्रमुख रुग्णालयांमध्ये सकाळी तीन, दुपारी दोन व रात्री एक याप्रमाणे सत्रनिहाय कर्मचारी असतील. तर उपनगरीय रुग्णालयांमध्ये सकाळी दोन व दुपारी एक याप्रमाणे कर्मचारी उपलब्ध असतील.

या हेल्प डेस्कवर लॅपटॉप अथवा संगणक तसेच दूरध्वनीची सोय असेल. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित मदत देण्यासाठी आवश्यक सॉफ्ट स्कील असणारे कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. या कर्मचाऱयांचे मराठीसह इंग्रजी व हिंदी भाषेतही प्रभूत्व असेल, तसेच त्यांना संगणकीय ज्ञान असेल. त्यासोबतच, या कक्षामध्ये नोंदणी पुस्तिका त्याचप्रमाणे सूचना पेटीची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad