मुंबई - ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागाकडे 154 तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रवाशांनी ऑटोरिक्षा व टॅक्सी विरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागाच्या व्हॉट्सॲपवर क्रमांक किंवा ईमेल आयडीवर तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑटोरिक्षा व टॅक्सीबाबत 31 जुलै पर्यंत परिवहन कार्यालयात एकूण 154 तक्रारी प्राप्त झाल्या असून या कार्यालयाशी संबंधित 59 तक्रारी आहेत. त्यापैकी 53 तक्रारी या ऑटोरिक्षा व 6 तक्रारी या टॅक्सी संबंधीत प्राप्त आहेत. तक्रारींमध्ये 45 तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, सात तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे आकारणे व दोन तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तन करणे याबाबत प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे 54 परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. यापैकी 99 परवानाधारकांचे ठोस कारणांशिवाय भाडे नाकारणे या कारणासाठी परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तसेच दोन परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणे, दोन परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाना 10 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
पाच तक्रारींबाबत तक्रारदारांनी चुकीची तक्रार नोंद केल्याबाबत तक्रारदारांना अवगत केले आहे. तसेच 15 परवानाधारकांचे परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करून या 15 वाहनांची वाहन 4.0 प्रणालीवर ब्लॅकलिस्ट (पाहिजे नोंद) घेण्यात आली आहे. तक्रारदारांना त्यांनी केलेल्या तक्रारीबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती व्हॉट्सअॅप व मेल आयडी या माध्यमातून त्यांना अवगत करण्यात आली आहे.
अशाप्रकारे नागरिकांशी गैरवर्तन करू नये अन्यथा या कार्यालयाकडून या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे. परवानाधारकांनी नागरिकांना चांगली सेवा द्यावी, असे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. या कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवासी तक्रार मदत कक्षाला नागरिक उत्तमप्रकारे प्रतिसाद देत आहेत. नागरिकांना ऑटोरिक्षा/टॅक्सी चालकांकडून गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणे आदी तक्रारी असतील, तर 9152240303 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आणि mh03autotaxicomplaint@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment