कृत्रिम तलाव विसर्जनात दीड पटीने वाढ ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2023

कृत्रिम तलाव विसर्जनात दीड पटीने वाढ !


मुंबई - यंदाच्या श्री गणेशोत्सवात पाच दिवसांच्या एकूण २९ हजार ७९२ घरगुती गणेश मूर्ती तर ५९८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या आहेत. गत वर्षी (२०२२) च्या पाचव्या दिवसाच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावात घरगुती मूर्ती विसर्जनाची संख्या तब्बल १८ हजार २०६ ने अर्थात दीड पटीने वाढली आहे.

दरम्यान, उत्साही आणि आनंदमयी वातावरणात पाचव्या दिवसाचे श्री गणेश मूर्ती विसर्जन संपन्न झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज (दिनांक २४ सप्टेंबर २०२३) सकाळी वेगवेगळ्या समुद्र किनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत महानगरपालिका कर्मचारी, कामगारांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी श्रमदान करत निर्माल्यासह प्लास्टिक तसेच भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा गोळा करुन समुद्र किनारा स्वच्छ केला.

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे त्याचप्रमाणे स्वच्छ मुंबई ही संकल्पना अधिक व्यापकतेने राबविण्यासाठी, सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मागील काही दिवसांत विशेष मोहीम राबवली आहे. या अंतर्गत दैनंदिन स्वच्छतेसह सध्याच्या गणेश उत्सव कालावधीत निरनिराळ्या स्वच्छता उपक्रमांवर भर दिला जात आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्र्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून ही वेगवेगळी कार्यवाही सुरू आहे. 

पाचव्या दिवसाच्या गणेश मूर्तींचे काल (दिनांक २३ सप्टेंबर २०२३) विसर्जन करण्यात आले. त्यात नैसर्गिक स्थळांसह कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यास देखील मुंबईकर नागरिकांची पसंती मिळाली आहे. पर्यावरणपूरक गणेश उत्सवास जनतेकडून प्राधान्य मिळत असून त्यातून पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यास हातभार लागतो आहे.

यंदा पाच दिवसांच्या एकूण २९ हजार ७९२ घरगुती गणेश मूर्ती तर ५९८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या आहेत. गत वर्षी (२०२२) पाचव्या दिवशी ११ हजार ५८६ घरगुती तर ३७७ सार्वजनिक गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावात घरगुती मूर्ती विसर्जनाची संख्या १८ हजार २०६ ने अर्थात दीड पटीने वाढली आहे, असे उपायुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी सांगितले.

मुंबईला लांबलचक आणि सुंदर किनारपट्टी लाभल्याने अनेक सार्वजनिक मंडळांसह घरगुती मूर्तींचे समुद्रात विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर आज (दिनांक २४ सप्टेंबर २०२३) सकाळी स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा आदी किनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात निर्माल्य संकलन करण्यात आले. त्याचप्रमाणे समुद्राच्या  भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा देखील काढण्यात आला. विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या विशेष स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. सागरी समृद्धी अबाधित ठेवण्यासाठी व मुंबई स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे महानगरपालिकेच्या उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.

जी उत्तर विभागात, माहीम समुद्र किनारी महानगर पालिका कर्मचाऱ्यांसह 'युनायटेडवेज' या स्वयंसेवी संस्थेच्या ६२ स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवित ५.६ मेट्रिक टन कचरा संकलित केला.

के पश्चिम विभागाच्या वतीने वर्सोवा समुद्र किनारी ५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ४० स्वयंसेवकांनी त्यात सहभाग घेतला.

के पश्चिम विभागाच्या वतीने 'वारसा आणि पर्यावरण संवर्धन फौंडेशन' या स्वयंसेवी संस्थेच्या ५० स्वयंसेवकांच्या सहकार्याने जुहू समुद्र किनारी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. त्यात ५.५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.

पी उत्तर विभागाच्या वतीने आणि धीरजलाल शहा महाविद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी एकत्रित मिळून मार्वे समुद्र किनारी स्वच्छता केली. या मोहिमेत ४ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.

तर , ए विभागाच्या वतीने बधवार पार्क येथे स्वच्छता मोहीम राबवित ४ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ११ स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते. 

विविध समुद्री किनारी संकलित झालेल्या या कचऱ्याची महानगरपालिकेमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad