विरोधात बातमी छापू नये म्हणून पत्रकारांना चहाला न्या - चंद्रशेखर बावनकुळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2023

विरोधात बातमी छापू नये म्हणून पत्रकारांना चहाला न्या - चंद्रशेखर बावनकुळे



मुंबई - आपल्या विरोधात एकही बातमी छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहाला घेऊन, जा धाब्यावर घेऊन जा असा सल्ला दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) दिलेल्या या अजब सल्ल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी नगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय 2024 विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांच्यासह नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते,

यावेळी बोलताना, "2024 ची लोकसभा निवडणूक होऊपर्यंत एकही बातमी आपल्या विरोधात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या या अभियानाच्या सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत. त्यासाठी आपण ज्या बुथवर काम करतो, तेथील सर्व पत्रकारांची माहिती मिळवा. त्या भागातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, स्वत:चे पोर्टल चालविणारे पत्रकार हेही पहावेत. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. त्यात सगळ्या मीडियाचे येतील असे पहावे. त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे काय करायचे ते समजलेच असेल. त्यात काही कमी जास्त झाले तर मदतीला खासदार विखे पाटील आहेतच," असे बानकुळे यांनी म्हटलं आहे.

विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.
- खासदार सुप्रिया सुळे

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. पत्रकार जनतेमध्ये आपल्या कामाची पब्लिसिटी करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी सुसंवाद ठेवा आल्यास चहा पाजा असे म्हटले होते. मात्र त्याचा विपर्यास करून बातमी छापण्यात आल्या.
- चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान व्यंगात्मक होते. त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये"...
- उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad