नांदेड / मुंबई - नांदेडच्या शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात सोमवारी (२ ऑक्टोबरला) आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील आणखी ७० बालके आणि ४२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. (31 patients died in Nanded Government Hospital)
३१ रुग्णांचा मृत्यू -
शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचारासाठी दाखल झालेल्या १२ नवजात बालकांसह तब्बल २४ रुग्णांचा २४ तासांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी (२ ऑक्टोबरला) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, सोमवारी आणखी ७ जणांचा मृत्यू झाल्याने रात्री उशिरापर्यंत मृतांची संख्या ३१ वर गेली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी ७० बालके आणि ४२ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, येथे नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. हा प्रकार औषधाचा तुटवडा असल्याने घडल्याचे शासकीय रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. याला डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोपही नातेवाईकानी केला. यासंदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांच्यावरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात येत आहे.
चौकशीची मागणी -
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आणि अधिष्ठाता वाकोडे यांची भेट घेऊन चर्चा करतानाच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह राजकीय नेते मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. या धक्कादायक घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सोमवारी ७ रुग्ण दगावले -
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत २४ रुग्णांचा बळी गेल्याचे उघड झाले आहे. २४ पैकी १२ नवजात बालके आणि इतर १२ जणांमध्ये प्रौढ व्यक्ती (पाच पुरुष, ७ महिला) यांचा समावेश आहे. सोमवारीदेखील उपचारादरम्यान आणखी ७ रुग्ण दगावले. त्यामुळे मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे. अत्यवस्थ रुग्णांची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अत्यवस्थ रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
No comments:
Post a Comment