मुंबई - शिखर बँकेतील २५ हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट रद्द करा, अशी विनंती करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, शालिनीताई पाटील आणि माणिकराव जाधव यांनी शनिवारी विशेष न्यायालयात निषेध याचिका दाखल केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळाच्या कथित सहभागाचा नव्याने तपास करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.
या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट पूर्णपणे खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकेवर शनिवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट रद्द करावा तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपासाचा अहवाल सादर केला, जाईपर्यंत निषेध याचिका प्रलंबित ठेवावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सतीश तळेकर यांनी केली. त्यावर सरकारी पक्षातर्फे अॅड. अजय मिसार यांनी याचिका फेटाळण्याची विनंती केली. याप्रकरणी न्यायाधीश रोकडे यांनी १० नोव्हेंबरला पुढील सुनावणी निश्चित केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणींत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
No comments:
Post a Comment