.jpg)
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या ९०० बालवाडीत कार्यरत जवळपास २ हजार शिक्षिका व मदतनीस यांच्या अनेक मागण्या गेली काही वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याच्या निषेधार्थ म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली बालवाडी शिक्षिका व मदतनीस ३१ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चाने धडकणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबईचे अध्यक्ष अशोक जाधव व सरचिटणीस वामन कविस्कर करतील, अशी माहिती युनियनचे चिटणीस अरुण नाईक यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या ९०० बालवाडीत कार्यरत जवळपास २००० शिक्षिका व मदतनीस यांच्या अनेक मागण्या गेली काही वर्षापासून प्रलंबित आहेत. याच बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्यामुळेच मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे MPS (मुंबई पब्लिक स्कूल) च्या शाळेतील बालवाडी वर्ग वाढविल्यामुळे या शाळेत देखील विद्यार्थी पटसंख्या कमालीची वाढली आहे. एकंदरीत बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांनी विभागवार फिरुन शाळाबाह्य मुलांना देखील या बालवाड्यांमध्ये प्रवेश दिलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालवाडी खाजगी संस्थांना चालविण्यास दिल्याने या संस्थांच्या संचालक व्यक्तीकडून होत असलेला मनमानी कारभाराला व अन्यायाला बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत त्यांनी कुठे वाच्यता केली किंवा युनियनकडे तक्रार केली की त्यांना कामावरुन कमी करणे, काढून टाकण्याच्या धमक्या देणे व त्यांना मासिक मानधन २-३ महिने न देणे असे प्रकार केले जात आहेत.
काय आहेत मागण्या -
ऑगस्ट २०२३ पासून ते अद्यापपर्यंत अनेक संस्थांनी त्यांना शिक्षिका व मदतनीस यांना मासिक मानधन दिलेले नाही. बालवाडी वर्गासाठी किरकोळ खर्चासाठी देण्यात येणारा सादिल खर्च हा देखील अनेक बालवाडी वर्गांसाठी वापरण्यात येत नाही. त्यामुळे शिक्षकांना स्टेशनरी, सफाई साहित्य व इत्यादीसाठीचा खर्च देखील स्वतःच्या वेळेवर न मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनात करावा लागतो, हि खेदाची बाब आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बालवाडी शिक्षिकांना ८,०००/- मानधन देण्यात येते. परंतु MPS (मुंबई पब्लिक स्कूल) बालवाडी शिक्षिकांना ५०००/- मानधन देण्यात येते. हा मानधनातील भेदभाव दूर व्हावा, तसेच ज्या बालवाडयांचा पट १००/१२० आसपास आहे. त्या ठिकाणी नवीन बालवाडी वर्गाला व शिक्षकांना मंजूरी देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या हजेरीपटावर व इतर माहिती मोबाईल अँपद्वारे करण्याची सक्ती केल्याने सर्व बालवाडी शिक्षिकांना महाराष्ट्र शासनाच्या अंगणवाडी सेविकाप्रमाणे मोबाईल व आवश्यक डाटा साठीचा खर्च देण्यात यावा तसेच महापालिकेच्या कामगार-कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीला भाऊबीज भेट म्हणून बोनस देण्यात यावा. या व इतर मागण्यांसाठी बालवाडी शिक्षिका व मदतनीस ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयावर धडकणार आहेत.