मुंबई - पश्चिम रेल्वेवर (Western Railway) खार-गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेचे बांधकाम केले जातेय. या कामानिमित्त २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान लोकलच्या तब्बल २,५२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेच्या मदतीला बेस्ट धावून आली आहे. ब्लॉकच्या कालावधीत अतिरिक्त बसगाडया चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ब्लॉक कालावधीत रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेवर ब्लॉक -
पश्चिम रेल्वेच्या खार-गोरेगावदरम्या नच्या सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. लोकल ट्रेनची गती आणि क्षमता वाढवण्यासाठी लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येत आहे. खार ते गोरेगावदरम्यान ८.८ किमीची मार्गिका उभारण्याचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतले आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान लोकलच्या तब्बल २,५२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय लांब पल्ल्याच्या ४३ एक्स्प्रेसही रद्द राहणार असून अनेक गाड्या विलंबाने धावणार आहेत. १८८ गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना ११ दिवस लोकलमध्ये गर्दीचा सामना करावा लागणार आहे.
बेस्टच्या अतिरिक्त बस -
खार व गोरेगाव दरम्यान २६-२७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते ५ नोव्हेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेवरील सहावी मार्गिका सुरु करण्याचे काम होणार असल्याबाबतचे पश्चिम रेल्वे प्राधिकारणाने परिपत्रक जाहिर केले आहे. या अनुषंगाने पश्चिम रेल्वे वेळापत्रकातील जवळपास ३०० हून अधिक फे-या दररोज रद्द होणार आहेत किंवा उशिरा धावणार आहेत. या फे-या रद्द किंवा उशिरा धावल्याने मुंबईतील प्रवाशांना होणारी गैरसोय दूर करण्याकरिता बेस्ट उपक्रमाने पश्चिम रेल्वेला समांतर असलेल्या एस. व्ही. रोड, लिंक रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या रस्त्यांवर धावणा-या २०२ मर्यादित, २०३ ४ मर्यादित ८४ मर्यादित, ३३ २२५, ४४० मर्यादित, ४० मर्यादित इत्यादी बसमार्गांवर अतिरिक्त बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कालावधीमध्ये आगार अधिका-यांना बोरीवली ते चर्चगेट दरम्यान रेल्वेस्थानकांकडील बसस्थानकातील मुख्यतः गोरेगाव ते सांताक्रुझ दरम्यान, प्रवाशांच्या गर्दीचे अवलोकन करून त्वरीत बसगाड्यांचे नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment