मुंबई - गिरगावमधील खोताची वाडी येथील विठ्ठलभाई पटेल मार्ग येथे उभारण्यात आलेल्या नवीन अभ्यासिकेचे लोकार्पण राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाले. महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास २ हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
या सोहळ्याला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, रविंद्र संघवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुंबईत अनेक कुटुंब लहान आकारांच्या घरात एकत्र राहतात. त्यामुळे अशा कुटुंबातील मुलांना अभ्यास करताना अडचणी येवू नयेत यासाठी खोताची वाडी परिसरात प्रशस्त अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार खोताची वाडी येथील विठ्ठलभाई पटेल मार्ग येथे ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
सदर अभ्यासिका ही महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जवळपास २ हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत मुले आणि मुली यांचेसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. या अभ्यासिकेमध्ये एकाचवेळी जवळपास ५० विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र टेबल आहे. त्यासोबत स्पर्धा परीक्षेची पुस्तके देखील याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अभ्यासासाठी पूरक वातावरण असून सीसीटीव्हीची देखील व्यवस्था आहे. प्राथमिक स्तरावर दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत अभ्यासिका सुरू राहणार असून विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार वेळेत बदल करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रेरणादायी व्याख्यानांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment