निळवंडे धरणाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 October 2023

निळवंडे धरणाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन


अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् – सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाइप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (जि. नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरण स्थानावर कोनशिलेचे अनावरण करून जलपूजन करण्यात आले. त्यानंतर डाव्या कालवा मार्गिकेने कळ दाबून पाणी सोडण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.

निळवंडे धरणाची प्रमुख वैशिष्टे -
उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे २) हा महाराष्ट्र राज्यातील एक मोठा पाटबंधारे प्रकल्प असून मौजे निळवंडे, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे प्रवरा नदीवर बांधण्यात आलेला आहे.
धरणाची एकूण लांबी ५३३ मीटर व महत्तम उंची ७४.५० मीटर इतकी आहे. धरणाचा सांडवा ओगी प्रकारचा असून त्यावर १२ मीटर x ६.५ मीटर आकाराच्या ५ वक्राकार द्वारांची उभारणी केली आहे. धरणाचा एकूण जलसाठा २३६ द.ल.घमी (८.३२ TMC) आहे.

प्रकल्पाच्या ८५ कि.मी. लांबीच्या डाव्या व ९२.५० कि.मी. लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे तसेच जलाशयावरील ४ उपसा सिंचन योजना तसेच उच्चस्तरीय पाइप कालव्यांद्वारे एकूण ६८ हजार ८७८ हेक्टर एवढी सिंचन क्षमता प्रस्तावित आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील २४ गावांमधील ४ हजार २३५ हेक्टर, संगमनेर तालुक्यातील ८० गावांमधील २५ हजार 428 हेक्टर, कोपरगाव तालुक्यातील ११ गावांमधील ५ हजार ६६६ हेक्टर, राहाता तालुक्यातील ३७ गावांमधील १७ हजार 231 हेक्टर, श्रीरामपूर तालुक्यातील ३ गावांमधील ९९९ हेक्टर, राहुरी तालुक्यातील 21 गावांमध्ये ८ हजार ८९ हेक्टर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 6 गावांमधील २ हजार ६१२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. अशा एकूण १८२ दुष्काळी गावांतील ६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad